Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे घटले प्रदूषण, करता येणार अवकाश निरीक्षण; मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 06:34 IST

मान्सून दाखल होईपर्यंत खगोलप्रेमींसाठी पर्वणी

मुंबई : लॉकडाउनच्या काळात कमी प्रदूषणामुळे मुंबईचे आकाशही थोडेसे स्वच्छ झाले आहे. परिणामी अनेकांना घरातील खिडकीतूनही आकाश निरीक्षणाचा आनंद घेता येत आहे. आता ढगांनी आकाशात गर्दी करायला सुरुवात केली असली तरी अजून काही मोजके दिवस खगोल निरीक्षणाची संधी आहे. या काळात अवकाशात शुक्र, गुरू, शनी, बुध आणि मंगळ हे ग्रह पाहता येतील.

लॉकडाउनमुळे वाहनांची रस्त्यांवरील गर्दी कमी झाली आहे. विमान वाहतूक बंद आहे. त्यातच औद्योगिक कामेही थंडावल्याने प्रदूषण कमी झाले आहे. त्यामुळे आकाशही बऱ्यापैकी स्वच्छ झाले आहे. त्यामुळे आकाशाआड दडलेल्या शुक्र, गुरू, शनी, बुध आणि मंगळ या ग्रहांचे दर्शन घेणे ही येत्या काही दिवसांसाठी खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.

दुसरीकडे याच आकाशातून डोकावणाºया आणि सर्वांच्याच कुतूहलाचा ठरणाºया चंद्र या उपग्रहाला अनेक धर्मांमध्ये सांस्कृतिक महत्त्व आहे. चंद्र हा पृथ्वीचा एकुलता एक नैसर्गिक उपग्रह आहे. तो महिनाभरात वेगवेगळ्या आकारात दिसतो, ज्याला चंद्रकला म्हटले जाते. शुक्लपक्ष म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत आकाराने वाढत जाणारा चंद्र आणि कृष्णपक्ष म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत आकाराने कमी होत जाणारा चंद्र होय. आता चंद्राच्या कला वाढत जातील आणि पुढील काही दिवस सूर्यास्तानंतर रात्रीच्या आकाशात चंद्र दिसू शकेल. त्याच्याही विविध कला अनुभवता येतील.

अचूक दिशेला पाहणे गरजेचे

मुंबईकरांना आणि संपूर्ण भारतातील लोकांना त्यांच्या घरातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) आणि हबल स्पेस टेलिस्कोप (एचएसटी) पाहण्याची संधी मिळाली आहे. कोरोनामुळे आकाशात विमानाची वाहतूक बंद असल्यामुळे, बहुतेक लोकांना कृत्रिम उपग्रह सहज ओळखणे सोपे होते. योग्य वेळेस अचूक दिशेला पाहण्यासाठी लोकांना विविध अ‍ॅप, आकाशाचे नकाशे आणि त्याबाबत उपलब्ध करून दिलेली माहिती उपयुक्त ठरत आहे.- शीतल चोपडे, शिक्षण सहायक, नेहरू विज्ञान केंद्र, वरळी

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या