Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात आंदोलन प्रकरण : लोढा, प्रवीण दरेकर यांची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 06:26 IST

बेकायदा पद्धतीने एकत्रित येऊन कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासारखे निष्काळजी कृत्य केल्याचा आरोप ठेवत या सर्वांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

मुंबई : कोरोनाकाळात २०२० मध्ये सायन हॉस्पिटलबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर, आमदार कॅप्टन तमीळ सेल्वन यांच्यासह सात जणांची महानगर दंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. बेकायदा पद्धतीने एकत्रित येऊन कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासारखे निष्काळजी कृत्य केल्याचा आरोप ठेवत या सर्वांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

दि. १५ सप्टेंबर २०२० रोजी एका २८ वर्षीय तरुणाचा रस्ता अपघात झाला होता आणि सायन रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या तरुणाचा मृतदेह अन्य कुटुंबांच्या ताब्यात देण्यात आला. ते कुटुंब त्यांच्या आत्महत्या केलेल्या नातेवाईकाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी थांबले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांनी आंदोलन केले. त्यानंतर रुग्णालयाने शवागृहातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आणि याप्रकरणाचा तपास केला. रुग्णाचा मृतदेह चुकीच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आल्याने त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी दरेकर यांच्यासह सेल्वन व इतर रुग्णालयात पोहोचले. त्यांना महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे निवेदन सादर करायचे होते. रुग्णालयाच्या अधिष्ठाता निवेदन स्वीकारण्यास तयार होते. मात्र, दरेकरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन स्वीकारण्यासाठी बोलवा, अन्यथा वाहतूककोंडी करू, अशी धमकी अधिष्ठाता यांना दिली, अशी साक्ष सरकारी वकिलांचे साक्षीदार असलेल्या पोलिसाने न्यायालयाला दिली. 

त्रुटी आल्या निदर्शनासआंदोलनावेळी सायन रुग्णालयाजवळ काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याने पोलिसांनी भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल केला. नेत्यांनी एसओपीचे पालन केले नाही. मास्क घातले नाही, सामाजिक अंतर ठेवले नाही आणि बेकायदेशीररीत्या एकत्र जमा झाले, अशी साक्ष पोलिसाने न्यायालयाला दिली. यावेळी दरेकरांच्या वकिलांनी सरकारी वकिलांच्या खटल्यात असलेल्या त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने लोढा, दरेकर, सेल्वन व अन्य सातजणांची निर्दोष सुटका केली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याप्रवीण दरेकरमंगलप्रभात लोढा