Join us  

कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ३०० दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 5:25 AM

Corona Virus News: सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट : दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने प्रशासन सज्ज

 लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने मुंबईत आता त्रिशतक गाठले आहे. याचाच अर्थ सांख्यिकीय विश्लेषणानुसार रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी आता तब्बल ३०० दिवसांवर पोहोचला आहे. मरिन लाइन्स येथे हा कालावधी ८०९, भायखळा, सँडहर्स्ट रोड, परळ आणि दादर येथे हा कालावधी ५०० दिवसांचा आहे. तर मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर हा आता आणखी घसरून ०.२२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत असून ही संख्या बुधवारी ११ हजार ५५७ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आणि रुग्णवाढीचा दर कमी होत असला, तरी कोविडविषयक सोयीसुविधांमध्ये कपात केलेली नाही. दुसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.रुग्ण दुप्पट होण्याचा हा कालावधी जितका जास्त तितका संक्रमणाचा वेग कमी असतो. आपण २१ ऑक्टोबर रोजी रुग्ण दुपटीचे शतक गाठले होते. २९ ऑक्टोबर रोजी १५७ दिवसांचा टप्पा ओलांडला होता. ५ नोव्हेंबर रोजी हा कालावधी ५१ दिवसांनी वाढून २०८ दिवस इतका झाला होता. १४ नोव्हेंबर रोजी २५५ दिवसांचा टप्पा गाठला. १७ नोव्हेंबर रोजी ३०० दिवसांचा टप्पा ओलांडला आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असताना रुग्णसंख्या वाढीमध्ये लक्षणीय घट नोंदविण्यात आली. रुग्णसंख्या वाढीचा दर जितका कमी तेवढे संसर्गावर नियंत्रण अधिक असल्याचे मानले जाते. हे पाहता, २९ ऑक्टोबर रोजी असलेला ०.४४ टक्के आणि ५ नोव्हेंबर रोजी ०.३३ टक्के इतका असणारा रुग्णवाढीचा सरासरी दर आता ०.२२ टक्के इतका झाला आहे.

सर्वांच्या सहकार्यामुळे शक्यलोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनामुळे, मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच प्रतिबंधात्मक उपाययोजना यशस्वी होत आहेत. कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी मुंबईकरांचे सहकार्य महापालिकेला निश्चित मिळेल.- इक्बाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस