Join us  

Corona New Variant Omicron: 'मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भीती, पालिकेने सतर्क राहावे', माजी आरोग्य मंत्र्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 6:18 PM

Corona New Variant Omicron:

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : युरोपमधील वाढता कोरोना आणि आफ्रिका-सिंगापूरमध्ये आलेल्या नवीन व्हेरिएंटमुळे मुंबईत कोरोना पसरण्याची भीती आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने सतर्क राहण्याचे  आवाहन राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना केले आहे. विविध आरोग्य विषयक समस्या आणि पश्चिम उपनगरातील इतर नागरी समस्यांविषयी डॉ. सावंत यांनी पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे यासंदर्भात आयुक्तांनी पालिकेच्या  संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या दालनात संयुक्त बैठक बोलवली होती. सुमारे एक तास चाललेल्या बैठकीत विविध विषयांवर सकारत्मक चर्चा झाल्याचे त्यांनी 'लोकमत'ला सांगितले.

दररोज विविध देशातून २०,००० प्रवाशांची ये-जा असते. त्यामुळे आरटीपीसीआर, व्हॅक्सिनेशन पूर्ण झाले की नाही याची कडक तपासणी होणे आवश्यक आहे. शिवाय पुन्हा एकदा सेरो सर्व्हिलन्स करावे, असे मत डॉ. दीपक सावंत यांनी मांडले. तसेच जिनोम सिक्वेसिंगसाठी या एनआयव्हीशी संपर्क साधून याबाबत अभ्यास करणे आवश्यक आहे, या विषयावर आयुक्तांनी सहमती दर्शवून तसे आदेशही दिल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत जरी लसीकरण ८० टक्क्यांच्या आसपास असले तरी मुंबईच्या अनेक भागात फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे. त्याच्यावर  लक्ष ठेवणे गरजेचे आहे,   कारण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात २८ ते ३० टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे फ्लोटिंग पॉप्युलेशन कारणीभूत ठरू शकते, असे मत बैठकीत डॉ. सावंत यांनी यावेळी मांडले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालय येथे वैद्यकीय महाविद्यालय उद्घाटन प्रसंगी कूपर रुग्णालयात कॅथ लॅब,  बर्न युनिट नेफ्रॉलॉजी डिपार्टमेंट पदव्युत्तर व सुपरस्पेशालीटी कोर्सेस व्हावेत अशी मागणी डॉ. दीपक सावंत यांनी केली होती. कोरोनामुळे मधल्या काळात हे सर्व काम प्रलंबित राहिले होते. त्यामुळे त्यांनी आयुक्तांच्या बैठकीद्वारे पाठपुरावा केला. यावेळी आयुक्तांनी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनापूर्वी कॅथलॅब,  बर्न युनिट तयार असेल असे आश्वास्तित केले.

नव्याने पुन्हा बांधण्यात आलेले विलेपार्ले (पू) येथील शिरोडकर रुग्णालयात प्रसूती रुग्णालय व नवजात अर्भक हा कक्ष सुरू करण्याविषयी ही पाठपुरावा या बैठकीत केला गेला. शिरोडकर रुग्णालयात नवजात अर्भक कक्ष सुरू झाल्यास अपुऱ्या महिन्याची अपुऱ्या वजनाची मुले जन्माला येतात त्याचा जीव वाचवता येईल आणि या भागात खाजगी नवजात अर्भक रुग्णालय गरीब कुटुंबाची अक्षरशः लूट करतात. त्यामुळे हे रुग्णालय सर्वोतपरी सुसज्ज होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी यावेळी मांडले.

सांताक्रूझ (प) येथील स्वामी विवेकानंद रोड ते लिकिंग रोड यामधील ग्रीन स्ट्रीट या रस्त्याचे काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून सुरू आहे. स्ट्रॉंम वॉटर ड्रेन सेवेरेज ड्रेन हे खोदून ठेवले असून येथे रस्ताही चालण्यासाठी नाही . अपघात होऊन अनेकांना दुखापती झाल्या आहेत . शिवाय 'गझदर बांध'  पंम्पिग स्टेशनचे काम गेल्या सहा वर्षापासून चालू आहे. या विषयीही डॉ. दीपक सावंत यांनी आयुक्तांना तोडगा काढण्यास सांगितले. कारण गेल्या ५० वर्षांपासून या भागात पावसाळ्यात पाणी कमरेभर साचते, गाड्या पाण्याखाली जातात 9 पम्प या भागात असूनही पाण्याचा निचरा होत नाही पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण व्हावीत असे आदेश देण्यात आले.

या बैठकीला अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी, आरोग्य संचालक मुंबई डॉ. मंगला गोमारे, पालिका उपायुक्त पराग मसूरकर, कूपर हॉस्पिटलचे डीन डॉ. मिलींद मोहिते, एच पश्चिम वॉर्डचे सहायक आयुक्त  विनायक विसपुते, के पश्चिम वॉर्डचे सहायक आयुक्त डॉ.पृथ्वीराज चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसदीपक सावंत