Join us  

राज्यातील ५० जणांचा कोरोना निगेटिव्ह; १० प्रवासी विलगीकरण कक्षात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 7:27 PM

मुंबई :  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज १० जण रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल करण्यात आले असून आतापर्यंत ५० जणांचे प्रयोगशाळा ...

मुंबईकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज १० जण रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल करण्यात आले असून आतापर्यंत ५० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरना निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आज मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात पाच जण, पुणे येथील नायडू रुग्णालय, आणि सांगली येथे प्रत्येकी तीन असे नऊ जणांना सौम्य लक्षणे आढळल्याने भरती करण्यात आले. त्यांचे नमुने आज प्रयोगशाळेस पाठविण्यात आले आहेत.

या नऊ जणांशिवाय आज मुंबई बंदरावर दाखल झालेल्या एका फिलिपाईन्स मधील एम व्ही बौडिका या जहाजावरील (क्रूझ) एका फिलिपाईन्स नागरिकाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने त्याला कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्याकरीता हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. या जहाजावर त्यावरील कर्मचाऱ्यांसह ८२४ जण असून यापैकी कोणीही भारतीय नाही तसेच इतर कुणाला कसलीही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.

आतापर्यंत रुग्णालयात भरती झालेल्या ६० प्रवाशांपैकी ४९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या ५ जण मुंबई येथे तर प्रत्येकी  ३ जण सांगली व पुण्यात भरती आहेत.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६३ विमानातील ३४ हजार २८३ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून १९३ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १३७ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

टॅग्स :कोरोनामुंबईडॉक्टरमहाराष्ट्रचीन