Join us  

एसटी महामंडळात कोरोनाने सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 5:49 PM

राज्यभरात एसटीचे २०० पेक्षा जास्त कर्मचारी कोरोना बाधित

मुंबई :  राज्यभरात एसटीच्या २१० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, एकूण सहा जणांचा मृत्यु कोरोनाने झाला आहे. यापैकी चार कर्मचारी मुंबई, ठाणे या विभागातील आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर येथील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याची जबाबदारी एसटी आणि बेस्ट प्रशासनावर आहे. बेस्टनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झपाट्याने होत आहे. राज्यात एकूण २१६ कर्मचारी कोरोना बाधित झाले. यापैकी ६ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला.   ठाणे विभागातील सर्वाधिक कर्मचारी कोरोना बाधित आहेत. ठाणे विभागात ८४ कर्मचारी कोरोना बाधित असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई विभागात ६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एसटी महामंडळातून दिली आहे.

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, मंत्रालय,महापालिका कर्मचाऱ्यांच्या ने- आण करण्यासाठी बेस्ट आणि एसटीच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येत होत्या. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर विभागातील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुंबईत कामावर येणाऱ्या सूचना महामंडळाने दिल्या होत्या, मात्र प्रवासी सेवा देताना महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही  उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची विषाणूची बाधा झाली आहे, असा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे.-------------------

आकडा तीनशे पार गेला, कर्मचारी संघटनेची माहितीकोरोना रुग्ण एसटीमध्ये वाढले आहेत. ठाणे आगारात १०० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. राज्यभरात ३०० पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आहेत. मात्र महामंडळाकडून आकडा जाहीर केला जात नाही, असा आरोप कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला. 

---------------------------

विश्रांतीगृहातून कोरोनाचा प्रसार झपाट्यानेएसटी आगारातील विश्रांतीगृहात कर्मचारी एकत्र राहत होते. विश्रांतीगृहात कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पालन झाले नाही. त्यामुळे एका कर्मचाऱ्यांकडून दुसऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. ठाणे आगारातील कर्मचारी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सर्वाधिक ने-आण करत आहेत. त्यामुळे ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढली असल्याची आहे. सध्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती एसटी कर्मचारी संघटनेकडून देण्यात आली. 

--------------------------

मुंबई, ठाण्यासह अन्य विभागात मोठया प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित कर्मचारी संख्या व एसटी महामंडळाच्या आकडेवारीत बरीच तफावत आहे. ज्या एसटी कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झालेली आहे, त्यांना त्यांच्या गावी जाण्याचा सल्ला अधिकारी वर्गाकडून  दिला जात आहे. त्यामुळे कर्मचारी गावाला गेल्याने आणखीन कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस