कोरोनामुळे मदत आटली, वृद्धाश्रम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 07:32 AM2021-04-22T07:32:20+5:302021-04-22T07:32:28+5:30

कोरोनामुळे मदतीचा ओघ कमी झाल्याने वृद्धाश्रम संकटात आल्याचे चित्र सध्या राज्यभरात पहायला मिळत आहे.

Corona helps, old age home in crisis | कोरोनामुळे मदत आटली, वृद्धाश्रम संकटात

कोरोनामुळे मदत आटली, वृद्धाश्रम संकटात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे मदतीचा ओघ कमी झाल्याने वृद्धाश्रम संकटात आल्याचे चित्र सध्या राज्यभरात पहायला मिळत आहे. ही स्थिती आणखी काही दिवस अशीच राहिल्यास वृद्धाश्रमातील निराधारांवर उपासमारीची वेळ ओढावणार असल्याचे स्वयंसेवी संस्थांनी सांगितले.
याविषयी द्वारका वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा कल्याणी पवार यांनी सांगितले की, पहिल्या लॉकडाऊनची झळ इतक्या मोठ्या प्रमाणात बसली नव्हती. पण आता पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे आर्थिक चणचण जाणवत आहे. मदतीचा ओघ कमी झाल्यामुळे दिवसागणिक स्थिती बिकट होत आहे. स्वखर्चातून निराधारांचे पोट भरत आहोत. पण त्यालाही काही मर्यादा आहेत. शासनाने वृद्धाश्रमांच्या प्रश्नाकडे वेळीच लक्ष न दिल्यास स्थिती बिकट होईल.
वृद्धाश्रमावर आर्थिक संकट कोसळले असले तरी येथे राहणाऱ्या वृद्धांना त्याची झळ बसू दिलेली नाही. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आम्ही दिवसरात्र झटत आहोत. वृद्धांसाठी नवनवे उपक्रम राबविणे, त्यांच्यासोबत खेळ खेळणे, गप्पा मारणे असा दिनक्रम असतो, असे पवार यांनी सांगितले.

मदतीसाठी आवाहन...
वृद्धाश्रमांना मदत करणाऱ्यांमध्ये मध्यमवर्गीयांची संख्या अधिक आहे. सध्या तेच अडचणीत असल्यामुळे त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करणे चुकीचे आहे. पण उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींनी स्वतःची सामाजिक जबाबदारी ओळखून आश्रमांना मदत केल्यास निराधारांच्या पोटात सुखाचे दोन घास जातील. सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून आम्ही अशा लोकांना मदतीसाठी वेळोवेळी आवाहन करीत आहोत, अशी माहिती कल्याणी पवार यांनी दिली.

कोरोनामुळे भेटी बंद
वाढदिवस किंवा विशेष दिवसाचे औचित्य साधून वृद्धाश्रमाला भेट द्यायला अनेकजण येतात. खाद्यपदार्थ, फळे, भेटवस्तू देऊन ते समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात. परंतु, सध्या वृद्धाश्रमात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी आम्ही भेटीस येणाऱ्यांना मज्जाव करीत आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला की त्यांना प्रवेश देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

आर्थिक मदत नको, 
किराणा माल द्या!
आमच्या आश्रमाकडे स्वतःची इमारत आहे. त्यामुळे भाडे किंवा अन्य गोष्टींची चिंता नाही. मात्र, दर महिन्याला किराणा माल मिळत राहिल्यास चिंता कमी होईल. ज्याला शक्य असेल त्याने अन्नधान्याची मदत करावी, असे आवाहन दिनकर पवार यांनी केले.

लसीकरणापासून वंचित
द्वारकामधील सर्व सभासद कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित आहेत. लस घ्यायची असल्यास लसीकरण केंद्रावर यावे लागेल, अशी अट आरोग्य विभागाने घातली आहे. परंतु, आमच्याकडील अनेक जणांना आधाराशिवाय चालता येत नाही, प्रवासाच्याही अडचणी आहेत. अशावेळी आश्रमात येऊन लसीकरण केल्यास कोरोनापासून आमचा बचाव होईल. शासनाने प्रत्येक वृद्धाश्रमात लसीकरणाची व्यवस्था करावी अशी मागणी या वृद्धाश्रमातील सदस्य विजय प्रभूदेसाई यांनी केली.

Web Title: Corona helps, old age home in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.