Join us  

कोरोनाच्या भीतीपोटी आणि आरोग्य विम्याला तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 6:56 PM

आॅनलाईन विमा काढणाचे प्रमाण वाढले

मुंबई - जगभरात दहशत निर्माण करणारा कोरोना आपल्या घरापर्यंतही पोहचू शकतो या भीतीपोटी आरोग्य विमा काढण्याचे प्रमाण गेल्या पंधरवड्यात वाढले आहे. घरोघरी जाऊन विमा काढणा-या एजंटवर लॉकडाऊनमुळे निर्बंध असले तरी आॅनलाईन पध्दतीने विमा काढण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१९ आणि २०२० या वर्षांतील मार्च महिन्यांतील विमा काढणा-यांची तुलना केल्यास ते प्रमाण १० ते १२ टक्क्यांनी वाढल्याची माहिती विमा कपन्यांकडून एजंटना दिली जात आहे. 

कोरोनाग्रस्त रुग्णांचे जे मेडिक्लेम विमा कंपन्यांकडे सादर होत आहे त्यानुसार सरासरी खर्च सव्वा दोन लाखांच्या आसपास जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या आठवड्यापर्यंत सर्वाधिक क्लेम साडे पाच लाखांचा देण्यात आला होता. कोरोनावरील उपचारांचे हे आकडे आणि या आजाराची लागण होण्याचा वाढता धोका लक्षात घेत अनेकांनी विमा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. देशातील चार प्रमुख कंपन्यांनी कोरोनासाठी विशेष पॉलिसीसुध्दा जाहिर केली आहे. तर, सरकारी अधिपत्याखाली कंपन्या त्या आघाडीवर फारशा सक्रिय दिसत नसल्याचे सांगण्यात आले. 

विमा काढण्याचे काम कॉर्पोरेट एजंट आणि परंपरागत पध्दतीने घरोघरी जाऊन विमा काढणारे एजंट अशा दोन स्तरांवर चालते. कोरोनामुळे लोकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचा फायदा घेत काही कॉर्पोरेट एजंट आक्रमक पध्दतीने मार्केटींग करून आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे तुम्हीसुध्दा जास्तीत जास्त लोकांना विम्यासाठी प्रोत्साहीत करून व्यवसाय वाढवा असे आवाहन या विमा कंपन्या आणि त्यांच्यासाठी कार्यरत असलेल्या कॉर्पोरेट एजंटकडून वैयक्तीक स्तरावर काम करणा-या एजंटना केले जात आहे. त्यासाठी सातत्याने ई - मेल आणि एसएमएससुध्दा धाडले जात असल्याची माहिती हाती आली आहे. त्याशिवाय या कंपन्यांना उपलब्ध होणारे फोन नंबर आणि ई मेलचा आधार घेत सर्वसामान्यांना विमा योजनांची माहिती पाठविण्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसांत वाढले आहे. 

या आजारामुळे लोकांमध्ये विम्याबाबतची जागरूकता वाढली आहे. मात्र, लोकांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना विमा घेण्यासाठी भाग पाडणे मला पटत नाही. सध्याच्या काळात स्वत:हून चौकशी केली तर आम्ही विमा काढण्याबाबतचे मार्गदर्शन करतो. तसेच, ज्यांनी यापुर्वी विमा काढण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यांच्याकडे संपर्क सुरू असून अनुकूल प्रतिसाद मिळत असल्याची माहिती ठाण्यातील विमा एजंट पारस मवानी यांनी दिली. तर, लोकांना विमा काढायचा असला तरी लॉकडाऊन संपल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेऊ अशी भूमिका काही जणांकडून घेतली जात असल्याचे मकरंद देसाई यांनी सांगितले. येत्या काही महिन्यांत विमा काढणा-यांची संख्या नक्कीच वाढेल असा विश्वासही त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.  

 

टॅग्स :आरोग्यकोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्या