Join us  

मुंबईतील सोसायट्यांची कोरोना कोंडी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 6:06 PM

शरीराचे तपमान आणि आँक्सिजनची पातळी तपासणीची जबाबदारी   

 

  • गृहनिर्माण संस्थांच्या राज्यस्तरीय महासंघाकडून विरोध  

 

मुंबई : प्रत्येक सोसायटीने थर्मल गन आणि आँक्सिमीटररची खरेदी करावी. सोसायटीतल्या प्रत्येक सदस्याच्या शरीराचे तपमान आणि आँक्सिजनची पातळी नियमित मोजावी. जर सदस्याला त्रास होत असेल तर त्याला रुग्णालयात दाखल करावे. या सर्व तपासण्याची रजिस्टरवर नोंद ठेवावी. पालिकेकडून ती तपासली जाईल… राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या बैठकीत झालेल्या या निर्णयामुळे मुंबईतील सोसाययट्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या निर्णय सरकारच्या विचाराधीन असून त्याला अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. मात्र, त्याबाबतची पत्रे सोसायट्यांना गेल्यामुळे संभ्रम वाढल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

१५ मे रोजी नवाब मलिक यांनी मुंबई महापालिकेच्या परिमंडळ पाचच्या अधिका-यांची एक बैठक झाली. त्यात सोसायटीच्या सेक्रेटरींना पत्र पाठवून अशा पद्धतीने तपासणीच्या सूचना देण्याबाबतचा निर्णय झाला होता. त्याचा आधार महाराष्ट्र वेलफेअर असोसिएशनने (महासेवा) सोसायट्यांना पत्र धाडले. या निर्णयाला महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाने कडाडून विरोध केला. सोसायट्यांनी विरोधाचा सूर आळवल्यानंतर आता महासेवानेसुध्दा भूमिका बदलली आहे.  

लाँकडाऊनच्या काळात सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन पालन न केल्यास पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करून संस्थेची नोंदणी रद्द करण्याचे इशारे दिले जात आहेत. त्यानंतरही प्रामाणिकपणे सोसायट्यांचे पदाधिकारी प्रामाणिकपणे या  आदेशांचे पालन करत आहे. मात्र, नव्या सूचनांप्रमाणे घरोघरी जाऊन सदस्यांची तपासणी करण्यास कोणताही सदस्य तयार होणार नाही. अशा तपासण्यांमुळे पदाधिका-यांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. तसेच, या सूचनांचे पालन केले नाही तर पदाधिका-यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल होतील अशा अफवादेखील पसरू लागल्याने सदस्यांमधिल अस्वस्थता वाढल्याचेही काही सोसायट्यांच्या पदाधिका-यांनी सांगितले.  

-------------------------------------

 

तपासण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असताना कोणतेही वैद्यकीय ज्ञान नसलेल्या सोसायटीच्या ती टाकणे धक्कादायक म्हणावे लागेल. चुकीची माहिती नोंद झाली किंवा एखादा दुर्देवी प्रसंग घडला तर या पदाधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल. राज्यातील कोणतीही गृहनिर्माण संस्था हे काम करणार नाही. सरकारी यंत्रणांनी त्यासाठी पुढाकार घेतल्यास त्यांना सहकार्य केले जाईल.

-  सिताराम राणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ

 

-------------------------------------

 

सरकरकडून वेळोवेळी दिल्या जाणा-या सूचनांबाबत गैरसमज पसरू नये म्हणून आम्ही त्या सूचना सदस्यांना सोप्या भाषेत कळवतो. त्यानुसार मलिक यांच्या बैठकीनंतर सूचना देण्यात आल्या होत्या. त्या कामांना सोसायट्यांनी तीव्र विरोध नोंदविला. त्यामुळे पालिका आयुक्तांसह संबंधित अधिका-यांना पत्र लिहून या सूचनांची अमलबजावणी करू नये अशी विनंती केली आहे. सोसायट्यांनाही त्याबाबत अवगत केले आहे.

-  रमेश प्रभू, अध्यक्ष, महासेवा

 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई