Join us  

मोठी बातमी! मुंबईत लवकरच अंशत: लॉकडाऊन होणार; पालकमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 1:24 PM

Mumbai Lockdown: कोरोनाचा (Covid-19) उद्रेक आटोक्यात न आल्यास लवकरच मुंबईत अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाणार

मुंबईत गेल्या २४ तासांत १,३६१ नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत. गेल्या १३१ दिवसांतील मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा हा सर्वाधिक आकडा आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (aslam shaikh) यांनी शहरात कोरोनाचा उद्रेक आटोक्यात न आल्यास लवकरच मुंबईत अंशत: लॉकडाऊन (Mumbai Partial Lockdown) करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत दिले आहेत. अस्लम शेख यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना लॉकडाऊन संदर्भातील माहिती दिली आहे. (Mumbai guardian minister hints at partial lockdown soon)

राज्यात रविवारी एका दिवसात तब्बल ११ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. रविवारचा रुग्णसंख्येचा आकडा गेल्या १४१ दिवसांमध्ये सर्वाधिक आकडा ठरला आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरोना रुग्ण वाढीची माहिती बैठकीत सादर केली असून वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. सप्टेंबर महिन्यापेक्षाही आता अधिक रुग्ण वाढत असल्याची माहिती देण्यात आली. त्यासोबतच अंशत: लॉकडाऊन बाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

राज्यात सध्या सक्रीय रुग्णांची संख्या देखील एक लाखाच्या (९७,९८३) जवळ पोहोचली आहे. यात मुंबईत सध्या ९ हजार ३१९ सक्रीय रुग्ण आहेत. लवकरच हा आकडा देखील १० हजारांचा टप्पा ओलांडेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्याचा रुग्ण वाढीचा दर पाहता एप्रिल महिन्यापर्यंत राज्यात सक्रीय रुग्णांचा आकडा २ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस