Join us  

CoronaVirus News: कोरोना आला, कर्जबाजारी करून गेला; रुग्णालयाचे बिल १९ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 11:30 PM

एकाच कुटुंबात आठ जणांना बाधा

- संदीप शिंदे मुंबई : साडेसहा वर्षांच्या मुलीपासून ते ७३ वर्षांच्या आईपर्यंत आठ जणांना कोरोनाने गाठले. एकापाठोपाठ एक जण रुग्णालयात दाखल होत होता. तब्बल १८ दिवस कोरोनाची दहशत अनुभवल्यानंतर हे कुटुंब कोरोनामुक्त झाले. मात्र, तोपर्यंत रुग्णालयांच्या बिलाचा आकडा १९ लाखांवर गेलर होता. चौघांचा आरोग्य विमा असल्याने ९ लाख रुपयांची भरपाई मिळाली. मात्र, उर्वरित १० लाख रुपयांसह अन्य खर्चाची तजवीज करताना हे कुटुंबच कर्जबाजारी झाले.

संजय देशमाने (नाव बदलले आहे) यांचा मुंबईच्या असल्फा परिसरात इस्टेट एजंटचा व्यवसाय आहे. ते ठाण्यातील रघुनाथ नगर परिसरातील एका इमारतीत राहतात. महिन्याभरापूर्वी गरजूंना अन्नवाटप करताना कोरोनाने गाठले असा त्यांचा संशय आहे. देशमाने यांना कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. मात्र, त्यांच्या पत्नीची तब्येत ढासळत होती. त्यामुळे एका खासगी लॅबमध्ये तपासणी केली. त्यात देशमाने दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रत्येकी साडेचार हजार रुपये भरून घरातील १३ जणांची तपासणी झाली. त्यात देशमाने यांची आई, बहीण, तिचा मुलगा, वहिनी आणि सहा वर्षांच्या मुलीसह आठ जण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हे कुटंब हादरले. मित्रांच्या सल्ल्यानुसार एकाठोपाठ सर्व जण घोडबंदर रोड येथील खासगी कोरोना रुग्णालयात दाखल झाले.

आठ जणांचे प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे चार लाख रुपये डिपॉझिट पहिल्याच दिवशी भरावे लागले. त्यापैकी फक्त चौघांचाच आरोग्य विमा काढलेला होता. देशमाने यांची पत्नी वगळता कुणालाही गंभीर लक्षणे नव्हती. परंतु, सर्वांवर रुग्णालयातच उपचार सुरू होते.दोन आठवडयानंतर एकापोठापाठ डिस्चार्ज मिळत होता. मात्र, त्यांच्यावरील उपचार खर्चाचा आकडा बघून देशमाने यांचे डोळे पांढरे होत होते.

तीन वेळा चाचणी केल्यानंतरही स्वत: देशमाने यांची चाचणी काही निगेटिव्ह येत नव्हती. लक्षणे दिसत नसल्याने खासगी हॉटेलमध्ये राहण्याच्या अटीवर त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला. चार दिवस हॉटेलमधील वास्तव्यानंतर अखेर त्यांची टेस्टही निगेटिव्ह आली. कोरोनाच्या प्रकोपातून सर्वजण सहीसलामत बाहेर पडल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, रुग्णालयांतील बिल भरण्यासाठी मित्रमंडळींकडून घेतलेल्या १० लाख रुपयांची परतफेड कशी करायची या विचाराने देशमाने यांची झोप उडाली आहे.

‘वैऱ्यावरही असा प्रसंग ओढवू नये’

च्कोणतीही गंभीर लक्षणे नसताना रुग्णालयांतील उपचारांचे बिल माझ्यासाठी धक्कादायक होते. पीपीई किटचे बिलही अवास्तव वाटत होते. त्याचे पैसेही विमा कंपनीकडून मिळाले नाही. आता १० लाखांची परतफेड करण्यासाठी दागिने विकणे किंवा गहाण ठेवण्याशिवाय पर्याय नाही. च्चारच महिन्यांपुर्वी असल्फा येथील आगीत माझ्या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले होते. त्यापाठोपाठ हे संकट कोसळले. मित्रमंडळी मदतीला आले म्हणून तरलो. परंतु, असा दुर्दैवी प्रसंग वैºयावरही ओढवू नये अशी प्रतिक्रिया देशमाने यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई