Join us  

Coroanvirus: मानवतेच्या आधारावर प्रधान सचिवांनी परवानगीचं पत्र दिलं, वाधवानप्रकरणाचा अहवाल आला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 11:29 AM

माध्यमांमध्ये वाधवान यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या बातम्या आल्यानंतर, महाबळेश्वर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, वाधवान कुटुंबातील २३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते.

मुंबई - कोरोनाचे भयंकर संकट वाढत असल्याने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असताना नियमांची पायमल्ली करत वाधवान कुटुंबियांनी मुंबई, खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट घेणाऱ्या दीवान हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (डीएचएफएल) प्रवर्तक, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भा. दं. वि.  कलम १८८ अन्वये आणि कलम १४४ अंतर्गत याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गृह विभागाचे प्रधान सचिव यांनी स्पष्टीकरण दिलं असून कुठलाही वरिष्ठ पातळीवरुन दबाव नसल्याचे त्यांनी सांगितले, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय. मानवेच्या आधारावरच परवागनीचं पत्र देण्यात आल्याचं गुप्ता यांनी या अहवालात म्हटले आहे. 

माध्यमांमध्ये वाधवान यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या बातम्या आल्यानंतर, महाबळेश्वर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, वाधवान कुटुंबातील २३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. क्वारंटाईनमधून मुक्त केल्यानंतर सीबीआयने कपिल आणि धीरज वाधवान यांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसेच, आता, याप्रकरणी चौकशी अहवाल प्राप्त झाल्याचेही देशमुख यांनी सांगितले. 

वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यासाठी पत्र देणाऱ्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्याबाबत नेमलेल्या अपर मुख्य सचिव मनोज सौनिक चौकशी समितीचा अहवाल प्राप्त. हा अहवाल रितसर माझ्याकडे येईल, पुढे मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यावर योग्य निर्णय होईल, असे देशमुख यांनी म्हटले. तसेच, या अहवालात अमिताभ गुप्ता यांनी स्वतः हे पत्र मानवतेच्या आधारावर दिल्याचे कबूल. त्यामुळे पत्र देण्याबद्दल त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता हे स्पष्ट. हा चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत महाराष्ट्र माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, सीबीआयच्या पथकाने कपिल आणि धीरज वाधवान यांना ताब्यात घेतले आहे. सातारा पोलिसांनी वाधवान बंधुना कोरोनासंदर्भातील काळजी म्हणून आवश्यक ती साधनसामुग्री दिली आहे. त्यासोबत १+३ गार्ड अशी पोलीस यंत्रणा त्यांच्यासोबत असून मुंबईत पाठविण्यात आले आहे. त्यासोबत, लिखित स्वरुपात पत्रही देण्यात आले आहे. 

वाधवान यांच्यावर आयपीसी १८८, २६९, २७०, ३४ त्याच बरोबर आपत्कालिन व्यवस्थानच्या कलम ५१ बी तसेच कोविड १९ च्या कलम ११ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे डीएचएफएल कंपनी आणि येस बँक घोटाळा प्रकरणात जामिनावर असलेल्या बंधू धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांना कुटुंबाच्या आपत्कालीन परिस्थितीचे कारण सांगून खंडाळ्याहून महाबळेश्वरकडे जाण्यास परवानगी मिळाली होती. चौकशीत धक्कादायक बाब उघड झाली होती. अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती त्यांच्यापुढे निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे संचारबंदीच्या कलम १४४चा भंग केला आहे. तसेच लॉकडाऊन काळात जाहीर करण्यात आलेले कलम १८८ चे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर महाबळेश्वर पोलिसांनी वाधवान कुटुंबियांसह २३ जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला .

दरम्यान, वाधवान प्रकरणावर गृहमंत्र्यांनी फेसबुकच्या माध्यमातून माहिती दिल होती, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या फार मोठ्या चुकीमुळे वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली. त्या वाधवान कुटुंबाचा आज दुपारी २ वाजता क्वारंटाइनची वेळ संपतेय. त्यामुळे पोलीस खात्याकडून ईडी आणि सीबीआय यांना पत्र लिहून कळवलं आहे. आज दुपारी २ नंतर वाधवान कुटुंबाला ताब्यात घ्यावं. सीबीआयचे अधिकारी जो पर्यंत वाधवान कुटुंबाला ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते आमच्या ताब्यात असतील. गेल्या १५ दिवसांपासून त्यांना एका हायस्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. राज्य शासन कोणत्याही परिस्थितीत वाधवान कुटुंबाला पाठीशी घालत नाही असं स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते. 

टॅग्स :मुंबईअनिल देशमुखगृह मंत्रालयमहाबळेश्वर गिरीस्थानकोरोना वायरस बातम्या