पालिका विभागांमध्ये समन्वय अधिकारी
By Admin | Updated: March 20, 2016 02:14 IST2016-03-20T02:14:14+5:302016-03-20T02:14:14+5:30
पायाभूत प्रकल्पांसाठी करोडोंची तरतूद केल्यानंतरही प्रत्यक्षात ३० टक्के निधीच खर्च होत आहे़ याची गंभीर दखल घेऊन विद्यमान पालिका आयुक्त अजय मेहता यांनी अधिकाऱ्यांना कामे

पालिका विभागांमध्ये समन्वय अधिकारी
मुंबई : पायाभूत प्रकल्पांसाठी करोडोंची तरतूद केल्यानंतरही प्रत्यक्षात ३० टक्के निधीच खर्च होत आहे़ याची गंभीर दखल घेऊन विद्यमान पालिका आयुक्त अजय मेहता यांनी अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करण्याची डेडलाइन दिली आहे़ या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सर्व विभागांत समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत़ त्यामुळे पारदर्शक व दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर राहणार असल्याने अर्थसंकल्पातील तरतुदीचा पुरेपूर वापर होईल, अशी हमी आयुक्तांनी अर्थसंकल्पीय भाषणातून आज दिली़
सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा ३७ हजार ५२ कोटी रुपये अर्थसंकल्पाला पालिकेच्या महासभेने आज अंतिम मंजुरी दिली़ सुमारे ५१ तास ८४ नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर भाषण केल्यानंतर शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास आयुक्तांनी भाषण केले़ या भाषणातून आयुक्तांनी पारदर्शक कारभार, गुणवत्ता, डेडलाइन यावर भर दिला़
प्लास्टिक बंदी आणि कबड्डीला प्रोत्साहन
पालिकेच्या सर्व उद्यानांमध्ये प्लास्टिक वापरावर बंदी करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत़ १५९ मैदाने विविध भारतीय खेळांनी विकसित करण्यात येणार आहेत़ तसेच कबड्डीसाठी ६७ ठिकाणी जागा राखून ठेवण्यात आली आहे़ त्याचबरोबर क्रिकेट, फुटबॉल, खो-खोसाठी जागा ठेवण्यात येणार आहे़ खेळाच्या मैदानांचा विकास करण्यात येणार आहे़
देवनार डम्पिंग ग्राउंडचा भार उतरणार
देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचा डोंगर उभा राहिल्याने आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे़ यावर तोडगा म्हणून देवनारमध्ये दोन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचा प्रकल्प फेब्रुवारी २०१९ पासून सुरू होणार आहे़
तसेच कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर २०१९ पासून पाच हजार मेट्रिक टन कचरा पाठविणे शक्य होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले़ त्याचबरोबर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विभागस्तरावर ओला व सुका कचरा वर्गीकरण केंद्र सुरू होत आहे़ अशी ३२ केंद्रे सुरू असून पुढच्या वर्षी आणखी ३५ केंद्रे सुरू होणार आहेत़