कोटणीस स्मारकासाठी सहकार्याचे आश्वासन
By Admin | Updated: September 26, 2014 23:30 IST2014-09-26T22:24:19+5:302014-09-26T23:30:06+5:30
दिल्ली येथे भेट : चीनच्या राष्ट्राध्यक्षांची समिती पदाधिकाऱ्यांशी चर्चा

कोटणीस स्मारकासाठी सहकार्याचे आश्वासन
वेंगुर्ले : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिल्ली येथे नुकतीच डॉ. कोटणीस स्मृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन डॉ. कोटणीस यांच्या स्मारकासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रजासत्ताक चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा भारतभेटीचा दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी डॉ. द्वाकरनाथ कोटणीस स्मृती समिती, वेंगुर्लेच्या पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी निमंत्रित केले होते. त्यानुसार समितीचे अध्यक्ष दादासाहेब करूळकर, सचिव अतुल हुले, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव व सल्लागार कुमार केतकर दिल्लीस रवाना झाले. या भेटीच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र व राज्यशिष्टाचार विभागाचे महासंचालक युआन मिंडाव व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. यावेळी समितीचे अतुल हुले यांनी समितीच्या १५ वर्षांच्या कार्याचा अहवाल व महत्वपूर्ण कार्याची छायाचित्रे सादर केली. तसेच डॉ. कोटणीस यांच्या पत्नी डॉ. को चिन लान यांनी वेंगुर्लेला दिलेल्या भेटीवेळी झालेल्या चर्चेची माहिती दिली. समितीच्या कार्याबद्दल सर्वांनी प्रशंसा व्यक्त केली व समितीच्या कार्याची नोंद घेण्यात आली.
हॉटेल ताजच्या दरबादा हॉलमध्ये भारतामधील पाच संस्थांचे प्रतिनिधी व चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट झाली. राष्ट्राध्यक्षांनी प्रथम डॉ. कोटणीस यांच्या भगिनी मनोरमा यांची भेट घेऊन त्यांना वंदन केले. यावेळी जिनपिंग यांनी, डॉ. कोटणीसांच्या मौलिक सेवेचा उल्लेख करून चीनची जनता कायम डॉ. कोटणीसांची ऋणी राहील, अशी ग्वाही दिली. डॉ. कोटणीस यांची पुतणी डॉ. मंगला व त्यांचे पती डॉ. राजन बोरकर यांनी कोटणीस कुटुंबियांतर्फे आभार मानले.
त्यानंतर डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मृती समितीला सत्कारासाठी निमंत्रित केले. समितीने गेल्या १५ वर्षात डॉ. कोटणीस यांच्या स्मरणार्थ केलेल्या कार्याची प्रशंसा करून याकामी प्रजासत्ताक चीनतर्फे डॉ. कोटणीस यांच्या भारतामधील स्मारकास सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. समितीचे अध्यक्ष दादासाहेब परूळकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांकडून मैत्री पुरस्कार स्वीकारला. सचिव अतुल हुले यांनी राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले.
या भेटीसाठी गेलेल्या सर्व प्रतिनिधींच्या विमान प्रवासाची तसेच दिल्ली येथील आयटीसी हॉटेलमध्ये निवासाची उत्तम व्यवस्था चीन सरकारतर्फे केली होती. या कार्यक्रमानंतर २२ सप्टेंबर रोजी प्रजासत्ताक चीनची मुंबई येथील कौन्सिल जनरल डॉ. ली योफा यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी अतुल हुुले यांनी १० आॅक्टोबर २०१४ रोजी डॉ. कोटणीसांच्या १०४ व्या जयंतीचा कार्यक्रम वेंगुर्ले येथील देवी सातेरी महाविद्यालयात होणार असल्याची माहिती देत कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. (प्रतिनिधी)