आदिवासींच्या विकासासाठी सहकार्य करावे- राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 04:56 IST2018-03-03T04:56:44+5:302018-03-03T04:56:44+5:30

राज्यातील १३ जिल्ह्यांत आदिवासींची संख्या जास्त असून, त्यांच्यासाठी कौशल्य शिक्षणाबरोबरच, जीवनमान उंचावण्यासाठी सर्वांगीण विकास करण्याची गरज आहे.

Cooperate with the development of the tribals - Governor | आदिवासींच्या विकासासाठी सहकार्य करावे- राज्यपाल

आदिवासींच्या विकासासाठी सहकार्य करावे- राज्यपाल

मुंबई : राज्यातील १३ जिल्ह्यांत आदिवासींची संख्या जास्त असून, त्यांच्यासाठी कौशल्य शिक्षणाबरोबरच, जीवनमान उंचावण्यासाठी सर्वांगीण विकास करण्याची गरज आहे. आगाखान संस्थेने त्यासाठी सहकार्य करावे, असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले.
राजभवन येथे शुक्रवारी शिया इस्माईली मुस्लीम समाजाचे इमाम आणि आगाखान संस्थेचे अध्यक्ष आगा खान यांचाशी चर्चा करताना बोलत होते. राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी ५ टक्के आर्थिक निधी हा थेट ग्रामपंचायतीला दिला जातो. आदिवासींना धनुर्विद्या प्रशिक्षण देण्यासाठी आगाखान संस्थेने मदत करावी. राज्यात सुरू करावयाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी शासनाचे संपूर्ण सहकार्य आगाखान संस्थेला देण्यात येईल, असे सांगून, शेवटी त्यांनी आगाखान यांचे इमाम या धर्मगुरूच्या सर्वोच्च स्थानावर ६० वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले.
आगाखान या वेळी म्हणाले, आगाखान संस्थेला ग्रामीण भागात काम करायचे आहे. शेतीचा विकास आणि शेतकºयांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी संस्था काम करेल. वारसा जतन करण्याच्या संदर्भात मुंबई विद्यापीठासोबत अभ्यासक्रमाची आखणी करायची आहे. संस्थेचे काम देशातील ६ राज्यांत सुरू असून, शिक्षण, आरोग्य आणि जीवनमान उंचाविण्याचा दृष्टीने तेथे काम सुरू आहे. राज्याला प्राचीन अशी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. भारतात सर्व जाती-धर्माचे लोक शांततेच्या मार्गाने जीवन जगतात, हा जगाला मोठा संदेश आहे. शेवटी त्यांनी राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या वेळी राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव, राजगोपाल देवरा, राज्यपालांचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी उपस्थित होते.

Web Title: Cooperate with the development of the tribals - Governor