Join us

‘स्वयंपाक येत नाही, हा टोमणा क्रूरता नाही’, विवाहितेच्या सासरच्यांविरोधातील गुन्हा रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 06:58 IST

तक्रारदार विवाहितेने केलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२० मध्ये तिचा विवाह झाला. त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात तिला घराबाहेर काढण्यात आले.

मुंबई : सासरच्या लोकांनी ‘तुला स्वयंपाकच करता येत नाही. तुझ्या आई-वडिलांनी तुला काही शिकवलेच नाही’, असा टोमणा मारल्याने सासू-सासरा आणि दिराविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेला उच्च न्यायालयाने अशा नकारात्मक टिप्पण्या कायद्याअंतर्गत क्रूरता ठरत नाही, असे सुनावतत महिलेने नातेवाइकांविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द केला. 

तक्रारदार विवाहितेने केलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२० मध्ये तिचा विवाह झाला. त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात तिला घराबाहेर काढण्यात आले. जानेवारी, २०२१ मध्ये तिने पतीविरोधात तक्रार दाखल केली. पतीने विवाह झाल्यानंतर वैवाहिक संबंध प्रस्थापित केले नाहीत, तसेच सासरचे टोमणे मारतात व अपमानही करतात, अशी तक्रार महिलेने केली होती. तसेच स्वयंपाकाच्या कौशल्यावरूनही सतत टोमणे मारले जातात, असेही नमूद केले.  

 महिलेच्या तक्रारीवरून संबंधितांविरोधात सांगली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दाखल केलेला गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करावे, या मागणीसाठी महिलेच्या दिराने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले.

काय म्हणाले उच्च न्यायालय?भारतीय दंड संहिता (आयपीसी) ४९८-अ अंतर्गत क्षुल्लक भांडणे ‘क्रौर्य’ मानले जात नाही. त्यासाठी महिलेला जाणूनबुजून आत्महत्या करण्यास भाग पाडणे, तिला जखमी करणे किंवा हुंड्यासाठी छळवणूक करणे इत्यादी बाबी प्रस्थापित कराव्या लागतील, असे न्या. अनुजा प्रभुदेसाई व न्या.नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट करीत सासरच्यांवरील गुन्हा व आरोपपत्र रद्द केले.

टॅग्स :न्यायालय