Join us

शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हे पक्षश्रेष्ठींना पटवून दिले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 06:20 IST

सत्ताबदलात मी मुख्यमंत्री होणार नाही हे मी ठरवले होते.

मुंबई : सत्ताबदलात मी मुख्यमंत्री होणार नाही हे मी ठरवले होते. माझ्या पक्षाला शिंदेंना मुख्यमंत्री केले पाहिजे हे सांगितले तेव्हा त्यांना ते पटवून देण्यास बराच काळ गेला. मी सरकारमध्ये राहणार नाही, प्रदेशाध्यक्ष होईन, असे सांगितले होते; पण मला उपमुख्यमंत्री व्हायला सांगितले, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून राजकीय खळबळ निर्माण केली.

एका टीव्ही शोमध्ये बोलताना फडणवीस यांनी राज्यातील सत्तानाट्य उलगडले. ते म्हणाले,  हे सरकार बदललं पाहिजे,  या सरकारमध्ये हिंदुत्ववाद्यांचा जीव गुदमरतोय, याबाबत मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोललो होतो. शिंदे एवढं मोठं पाऊल उचलतात. अशा परिस्थितीत त्यांचं नेतृत्व असलं पाहिजे. त्यांच्या लोकांना ते आत्मविश्वास देतील, असे पटवून दिले आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला.

मला प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते!

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर मी सरकारमध्ये राहणार नाही, असे मी माझ्या पक्षाला स्पष्टपणे सांगितले होते. मी प्रदेशाध्यक्ष होईन किंवा मला जी जबाबदारी द्याल ती घेईन. दोन वर्षे मेहनत करून पक्षाला क्रमांक एकचा पक्ष करतो, असे पक्षाला सांगितले होते आणि त्याप्रमाणे ठरलेही होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तो आनंद फार काळ टिकला नाही! 

मी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचे नाव जाहीर केलं. तेव्हा मला जिंकल्याचा आनंद होता. पण तो जास्त काळ टिकला नाही. घरी आल्यावर माझ्या नेत्याने सांगितले, तुला उपमुख्यमंत्री व्हायचे आहे. हा माझ्यासाठी धक्का होता. मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री होणार याचे दु:ख नव्हते. चिंता याची होती की लोक म्हणतील हा सत्तेसाठी किती हपापलाय. पण माझ्या नेत्यांनी जे नरेटिव्ह तयार केले त्यामुळे माझी उंची वाढली. पंतप्रधानांनी ट्वीट केले, त्यानंतर लोकांचा संभ्रम दूर झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.