Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांच्या नावे भव्य कन्व्हेंशन सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 04:13 IST

माझ्या आणि बाळासाहेबांच्या संबंधात भाजपा-शिवसेना असा विषय कधी आला नाही. आमचे संबंध त्या पलीकडचे होते. ‘आमचा नितीन’ असा उल्लेख ते करायचे.

मुंबई : माझ्या आणि बाळासाहेबांच्या संबंधात भाजपा-शिवसेना असा विषय कधी आला नाही. आमचे संबंध त्या पलीकडचे होते. ‘आमचा नितीन’ असा उल्लेख ते करायचे. अशा बाळासाहेबांप्रति कृतज्ञता म्हणून त्यांच्या नावे वरळी कोळीवाड्यात एक भव्य कन्व्हेंशन सेंटर उभारण्याची आपली इच्छा असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. याबाबत आपण अलीकडेच आदित्य ठाकरेंशी चर्चा केली असल्याची माहिती त्यांनी दिली.राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या सदस्यांशी नागपुरातील निवासस्थानी बोलताना गडकरी यांनीच ही माहिती दिली. शिवसेनाप्रमुखांचे महापौर निवासस्थानात स्मारक होईलच. राज्य शासन त्यासाठी सर्व आवश्यक कार्यवाही करीत आहे; पण सोबतच हे वरळी सी-लिंकच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने कन्व्हेंशन सेंटर उभारावे, असे आदित्य ठाकरे मला गेल्या आठवड्यात दिल्लीत भेटायला आले तेव्हा मी सुचविले आहे. आदित्य ठाकरे हे महापालिका व इतर संबंधितांशी बोलून त्याबाबत आपल्याशी पुन्हा चर्चा करतील, अशी अपेक्षा असल्याचे गडकरी म्हणाले.वरळी कोळीवाड्यात महापालिकेची तीन एकर जागा आहे. बाजूला दोन एकर जागा बॉम्बे पोर्ट ट्रस्टची (बीपीटी) आहे. या दोन्ही जागा कन्व्हेंशन सेंटरसाठी दिल्या तर तेथे भव्य वास्तू उभी राहू शकेल, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.महापालिकेची जागा मोकळी नाही. तेथे अतिक्रमण होऊन आज पक्की घरे बांधली गेली आहेत. बाजूला बीपीटीच्या जागेवर कर्मचाऱ्यांसाठीचे क्वार्टर्स आणि मोकळे मैदान आहे. बीपीटीने ही जागा कन्व्हेंशन सेंटरसाठी दिली तर त्यांना कर्मचाºयांसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. सर्वांत मोठे आव्हान महापालिकेच्या जागेवरील घरे हटविण्याचे असेल.गडकरी म्हणाले, वरळी कोळीवाड्याच्या पुनर्विकासाची योजना राबवावी. सर्वांना पक्की घरे बांधून द्यावीत आणि काही जागा सेंटरसाठी राखून ठेवावी, असेही मी सुचविले आहे.महापालिका बेस्ट समितीचे अध्यक्ष आणि वरळी भागातील शिवसेनेचे नेते आशिष चेंबूरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोळीवाड्याचा पुनर्विकास आणि शिवसेनाप्रमुखांच्या नावे कन्व्हेंशन सेंटर उभारण्याची गडकरी यांची कल्पना आहे. त्याबाबत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे त्यांच्याशी चर्चा करतील. कोळीवाड्याचा पुनर्विकास हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊनच पुढे जाण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेनितीन गडकरी