चिंचपाड्यातील आदिवासी रहिवाशांना हव्यात सुविधा
By Admin | Updated: May 27, 2014 01:18 IST2014-05-27T01:18:35+5:302014-05-27T01:18:35+5:30
गावातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेचे शिक्षण मिळावे म्हणून शासनाने येथे जिल्हा परिषदेची १ ली ते ४ थी पर्यंतची शाळा व अंगणवाडी केंद्र सुरू आहे. विद्यार्थ्यांकरीता योग्य अशी पाण्याची सोय नाही.

चिंचपाड्यातील आदिवासी रहिवाशांना हव्यात सुविधा
राहुल वाडेकर, तलवाडा - विक्रमगड तालुक्यातील चिंचपाडा हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून विकसाच्या प्रतीक्षेत असून सरकारी यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गावातील लोकांची दयनीय अवस्था झालेली असून लोकांना मूलभूत सुविधा मिळणेही कठीण झाले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचीही गंभीर समस्या आहे. विक्रमगड तालुक्यातील चिंचपाडा हे गाव टेकडीवर वसलेले आहे. या गावाची लोकसंख्या ४०० ते ५०० च्या आसपास असून या गावात १०० टक्के आदिवासी समाज राहतो. या गावाला तीनही बाजूने डोंगर-दर्यांनी वेढलेले आहे. एका बाजूस सजन देखील लघू पाटबंधारे प्रकल्प आहे. हे गाव खोस्ते ग्रामपंचायत हद्दीच्या कार्यक्षेत्रात येते. गावातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेचे शिक्षण मिळावे म्हणून शासनाने येथे जिल्हा परिषदेची १ ली ते ४ थी पर्यंतची शाळा व अंगणवाडी केंद्र सुरू आहे. विद्यार्थ्यांकरीता योग्य अशी पाण्याची सोय नाही. बोअरवेल मारण्यात आलेल्या आहेत. परंतु त्यांना पाणीच नाही. या गावाच्या विकासाकडे कुणीही लक्ष दिलेले नसल्याचा आरोप येथील रहिवासी वारंवार करीत आलेले आहेत. गावाच्या एका बाजूला सजन लघुपाटबंधारे प्रकल्पाचे स्त्रोत आहे. या जलाशयात गावातील काही लोकांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. असे असताना या गावात पाणीपुरवठा योजना नाही. गावासाठी एक विहीर असून तीही उन्हाळ्यात तळ गाठते. त्यामुळे महिलांना बंधार्याच्या जलाशयाच्या शेजारी खड्डे खोदून दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. खड्ड्यातील मातीमिश्रीत पाण्यामुळे छोटे मोठे जंतूसंसर्ग रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात दळणवळणाची मोठी समस्या असून ग्रामस्थांना पायीच ४ ते ५ कि.मी. पायपीट करावी लागते.