कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे नागरिकांना सुविधा
By Admin | Updated: November 30, 2014 22:46 IST2014-11-30T22:46:04+5:302014-11-30T22:46:04+5:30
ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत व पंचायत समित्या आर्थिकदृष्ट्या अधिक स्वयंपूर्ण होण्याकरिता तसेच नागरिकांच्या सोयीसाठी नावीन्यपूर्ण योजनांतर्गत कॉमन
कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे नागरिकांना सुविधा
भिवंडी : ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत व पंचायत समित्या आर्थिकदृष्ट्या अधिक स्वयंपूर्ण होण्याकरिता तसेच नागरिकांच्या सोयीसाठी नावीन्यपूर्ण योजनांतर्गत कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे. हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने गटविकास अधिकारी डॉ. करुणा जुईकर जिल्ह्यात प्रथमच भिवंडीत राबवत आहेत.
भिवंडी पंचायत समिती अंतर्गत ११८ ग्रामपंचायती असून त्यापैकी प्राथमिक स्तरावर तालुक्यातील अंबाडी, धामणगाव, म्हापोली, दापोडे, खोणी, सोनाळे अशा ३६ ग्रामपंचायतींत या सुविधा सुरू होणार आहेत. रिचार्ज, मोबाईल बिल भरणे, राष्ट्रीय पेन्शन योजना, रेडबस तिकीट बुकिंग, एलआयसी प्रीमिअम भरणा, शेतकरी असल्याची नोंदणी, आरोग्य देखभाल सेवा, रेल्वे आरक्षण, आधारकार्ड प्रिंटिंग, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड अशा एकूण १९ सेवा या माध्यमातून देण्यात येणार आहेत. तसेच वीज बिल भरण्याची सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी करुणा जुईकर यांनी दिली.
जिल्ह्यात १३ पंचायत समित्या असून या सर्व सुविधांसह पंचायत समिती कार्यालयांतर्गत एटीएम सेवा सुरू होत आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. या दोन्ही सुविधांचा लोकांना लाभ मिळणार आहे. शिवाय, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. (प्रतिनिधी)