घंटागाड्या वेळेत न पुरवविणारा ठेकेदार काळ्या यादीत

By Admin | Updated: March 4, 2015 23:18 IST2015-03-04T23:18:13+5:302015-03-04T23:18:13+5:30

पालिकेने दिलेल्या ठराविक मुदतीत घंटागाड्या न पुरवून फसवणूक करणाऱ्या मे. समिक्षा कन्स्ट्रक्शनस्ला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.

The contractor not providing the time in the Ghantagadi period | घंटागाड्या वेळेत न पुरवविणारा ठेकेदार काळ्या यादीत

घंटागाड्या वेळेत न पुरवविणारा ठेकेदार काळ्या यादीत

ठाणे : नौपाडा, उथळसर व कोपरी प्रभाग समितीत पालिकेने दिलेल्या ठराविक मुदतीत घंटागाड्या न पुरवून फसवणूक करणाऱ्या मे. समिक्षा कन्स्ट्रक्शनस्ला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. तसेच या प्रभाग समित्यांमधून नव्याने घंटागाडी घेण्यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आणला आहे.
महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी सहाचाकी व चारचाकी घंटागाड्या भाडेतत्वावर घेतल्या होत्या. या निविदेची मुदत संपल्यानंतर पुन्हा पाच वर्षासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात नौपाडा, उथळसर व कोपरी प्रभाग समितीचा समावेश होता. घंटागाडी पुरविण्याचे काम मे. समिक्षा कन्स्ट्रक्शनला देण्यात आले होते. अटी शर्तीनुसार कार्यादेश दिल्यानंतर ९० दिवसात नवीन घंटागाड्याचा पुरवठा करणे कंत्राटदारास बंधनकारक केले होते. परंतु त्याच्याकडून त्या पुरविण्यात आल्या नाहीत. त्यानंतर त्याच्यासमवेत पालिकेने चर्चा केली असता, त्याने पुन्हा तीन महिन्यांची मुदत मागितली. त्यानुसार त्याला मुदतवाढही देण्यात आली होती. परंतु तिचा कालावधी डिसेंबर २०१४ रोजी संपुष्टात आला आहे. तसेच यापुढे कंत्राटदाराची काम करण्याची मानसिकताही दिसत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सध्या नौपाडा, उथळसर, कोपरी या भागात घंटागाड्या देखील फिरकत नसल्याने येथे कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.
यावर उपाय म्हणून आता पालिकेने नव्याने निविदा काढल्या असून नौपाड्यासाठी ११, उथळसर ९ आणि कोपरीसाठी ४ अशा एकूण २४ गाड्या घेण्याचे निश्चित करून यासाठी वार्षिक ४७ लाख १७ हजार ४४९ रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. या संदर्भातील प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला आहे. तसेच यामध्ये निर्धारीत केलेल्या कालावधीत घंटागाडी न पुरविणाऱ्या मे. समिक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्तावही मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या कामासाठी ५३ लाख ८५ हजार ९१५ रुपयांचा खर्च केला जात होता. आता तोच खर्च कमी होत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The contractor not providing the time in the Ghantagadi period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.