ठेकेदारांच्या जादा बोलीचा शौचालयबांधणीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:31 IST2018-10-14T00:29:56+5:302018-10-14T00:31:26+5:30
कामे रखडली : निविदेला अल्प प्रतिसाद, शोधमोहिमेसाठी मुदत वाढवली

ठेकेदारांच्या जादा बोलीचा शौचालयबांधणीला फटका
मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत सार्वजनिक शौचालय बांधण्याच्या प्रकल्पाला आणखी एक झटका बसला आहे. जागेअभावी शौचालये बांधण्याचे काम रखडले असताना, निविदेला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादाचा फटकाही या प्रकल्पाला बसला आहे. ठेकेदारांनी जादा बोली लावल्यामुळे शौचालयांचे बांधकाम लांबणीवर पडणार आहे.
मुंबई हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला. त्यानुसार, मुंबईत सार्वजनिक शौचालये वाढविण्याचा प्रकल्प जाहीर करण्यात आला. यासाठी महापालिकेने निविदा काढल्या, परंतु पालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा ठेकेदारांनी जादा बोली लावली आहे. अशा २३ निविदांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता नवीन ठेकेदार शोधण्यासाठी निविदेची मुदत १७ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये शौचालयांची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने २० प्रभागांमध्ये ठेकेदार नियुक्त केले आहेत.
या ठेकेदारांमार्फत मुंबईत पाच हजार तीनशे शौचकूप बांधण्यात येणार होते. मात्र, या ठेकेदारांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये दोन हजार २५३ शौचकूपांची उभारणी केली. त्यामुळे नऊ ठेकेदारांना उर्वरित शौचकूप बांधण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
ठेकेदारांची जादा बोली खर्च अंदाजापेक्षा अधिक
- प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईत २२ हजार ७७४ शौचकूप बांधण्यात येणार आहेत. मात्र, गेल्या वर्षी यासाठी मागविलेल्या निविदा पालिकेने अंदाजलेल्या खर्चापेक्षा जास्त आहेत.
- महापालिकेने जुलै महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात ९३४ सार्वजनिक शौचालयांचे आॅडिट करण्यात आले. त्यात ४२३ शौचालये धोकादायक असल्याचे उजेडात आले.
- १९९७ ते २०१८ या २० वर्षांत १४ हजार ३६९ शौचालये बांधण्यात आली. ही शौचालये झोपडपट्ट्यांमधील नोंदणीकृत संस्थांच्या ताब्यात देण्यात आली.
- महापालिकेने २०२१ पर्यंत मुंबईत २२ हजार ७७४ शौचकूप बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ही शौचालये दुमजली व तीन मजली असणार आहेत.
- संपूर्ण २४ विभागांमध्ये शौचालये बांधण्यासाठी महापालिकेला ५३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.