कचऱ्याच्या डंपरवरून पडल्याने कंत्राटी कामगार गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:23 IST2021-02-05T04:23:55+5:302021-02-05T04:23:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : येथील वागळे इस्टेटच्या सीपी तलाव येथे कचऱ्याच्या डंपरवरून पाय घसरून पडल्यामुळे निलेश घोरपडे (३९,रा. ...

कचऱ्याच्या डंपरवरून पडल्याने कंत्राटी कामगार गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : येथील वागळे इस्टेटच्या सीपी तलाव येथे कचऱ्याच्या डंपरवरून पाय घसरून पडल्यामुळे निलेश घोरपडे (३९,रा. ठाणे) हा हंगामी कामगार गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे तो बेशुद्धावस्थेत असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्याच्या सहकारी कामगारांनी दिली. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सीपी तलाव येथे कचऱ्याच्या डंपरमध्ये कचरा भरल्यानंतर त्यावर ताडपत्री बांधण्यासाठी निलेश हा डंपरवर चढला होता. त्यावेळी त्याचा पाय घसरल्यामुळे तो खाली डोक्यावर पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, त्याच्या नातेवाईकांनी त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकारी कामगारांनी दिली. याप्रकरणी पोलीस अद्याप पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले.