Join us

Mumbai: अनैतिक संबंधांबाबत सतत चौकशी, संतप्त पतीने झोपेतच आवळला पत्नीचा गळा, आरोपी पती अटकेत

By मनीषा म्हात्रे | Updated: July 28, 2023 15:05 IST

Mumbai: अनैतिक संबंधाबाबत सतत चौकशी करत असल्याच्या रागात पतीने पत्नी झोपेत असतानाच तिची गळा आवळून हत्या केल्याची घटना वडाळ्यात समोर आली आहे.

मुंबई :  अनैतिक संबंधाबाबत सतत चौकशी करत असल्याच्या रागात पतीने पत्नी झोपेत असतानाच तिची गळा आवळून हत्या केल्याची घटना वडाळ्यात समोर आली आहे. याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवत आरोपी पती राजेश वसंत इनरकर (३२) याला अटक करण्यात आली आहे.

वडाळा शिवडी क्रॉस रोड परिसरात राहणाऱ्या रोशनी राजेश  ईनरकर (२८) या महिलेचा मृत्यू झाला आहे. २७ जुलै रोजी रोशनी यांना केईएम रुग्णालयात नेले. तेथे त्यांना दाखल करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले. मृतदेहाच्या गळ्याभोवती व्रण दिसून आल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालात गळा दाबून मारल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पतीकडे उलट तपासणी करताच, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

त्यानुसार, गुरुवारी रात्री उशिराने त्याला अटक केली आहे. पत्नी अनैतिक संबंधाची सतत चौकशी करून वाद घालत असल्याच्या रागातून ती झोपेत असतानाच तिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी