पोट्रेट पेंटिंगची चळवळ सुरूच ठेवू
By Admin | Updated: December 31, 2014 01:31 IST2014-12-31T01:31:42+5:302014-12-31T01:31:42+5:30
‘सर्व कलाकारांसाठी पोट्रेट पेंटिंगची अखंड चळवळ आम्ही राबवित आहोत. या चळवळीत प्रस्थापित कलाकारांकडून नवोदितांना मार्गदर्शन करण्यात येईल.

पोट्रेट पेंटिंगची चळवळ सुरूच ठेवू
मुंबई : ‘सर्व कलाकारांसाठी पोट्रेट पेंटिंगची अखंड चळवळ आम्ही राबवित आहोत. या चळवळीत प्रस्थापित कलाकारांकडून नवोदितांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच, वर्षभर पोट्रेटविषयी निरनिराळे कार्यक्रम राबविले जातील, जेणेकरून पोट्रेट पेंटिंगचा वसा असाच अबाधित राहील,’ असे चित्रकार वासुदेव कामत यांनी सांगितले. जे. जे. स्कूल आॅफ आर्टच्या प्रांगणात मंगळवारी पोट्रेट जत्राचा शुभारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
पोट्रेट पेंटिंगची परंपरा आपल्याकडे पूर्वीपासून आहे. अगदी जे. जे. स्कूल आॅफ आर्टच्या स्थापनेपासून या क्षेत्रात काम करणारे कलाकार आपल्याकडे अनेक आहेत. जेव्हा एखादा कलाकार कलाकृती साकारतो तेव्हा त्याचे मॉडेल त्यांच्या डोळ्यांसमोर स्थिर ठेवतो, मात्र या वेळी एकाच वेळी तीन कलाकारांनी एकमेकांचे पोट्रेट कॅनव्हासवर साकारत कलारसिकांचे मन जिंकले. याप्रसंगी, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, सुहास बहुलकर आणि अनिल नाईक यांनी एकमेकांचे पोट्रेट साकारले.
वासुदेव कामत यांनी क्रेआॅन माध्यमातून अनिल नाईक आणि सुहास बहुलकर यांचे चित्र साकारले. तर अनिल नाईक यांनी अॅक्रलिकच्या माध्यमातून सुहास बहुलकर आणि वासुदेव कामत यांचे चित्र साकारले. आणि सुहास बहुलकर यांनी वासुदेव कामत आणि अनिल नाईक यांचे पोस्टर्स कलर्सच्या माध्यमातून चित्र साकारले. प्रत्येक चित्रकाराची स्वत:ची अशी वेगळी शैली असते, याचा प्रत्यय या वेळी आला. शिवाय, नेमके कोण कोणाचे पोट्रेट साकारत आहे याबद्दल कलारसिकांमध्ये वेगळेच कुतूहल दिसून आले. या वेळी चित्रकार एकमेकांचे चित्र साकारत असल्याने त्यांची एकाग्रता वाखाण्याजोगी दिसून आली.
या वास्तूमुळे आम्ही कलेशी जोडले गेलो, त्यामुळे आम्ही या वास्तूचे पाईक आहोत. आपल्याला हा वास्तूचा वारसा कलेतून पुढे न्यायचा आहे, अशा शब्दांत या तिन्ही कलाकारांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. (प्रतिनिधी)
आॅनलाइन पोट्रेट स्पर्धेचा आज निकाल
आॅनलाइन पोट्रेट स्पर्धेची अंतिम फेरी आज जे. जे. स्कूल आॅफ आर्टच्या प्रांगणात रंगणार असून, या स्पर्धेत फेसबुकवर १२ महिन्यांत जाहीर केलेले विजेते सहभागी होतील. या विजेत्यांमध्ये ही महाअंतिम फेरी पार पडेल. या स्पर्धेची महाअंतिम फेरी जे.जे.च्या प्रांगणात रंगणार असून, त्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.