मुंबई - ऐन उन्हाळ्यात मुंबईत पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. पुनर्विकासाचे वेध लागलेल्या धारावीत दूषित, अनियमित पाणीपुरवठा होत आहे. बेकायदा जलजोडण्यांमुळे अपुऱ्या दाबाने येणारे पाणी, तर दुसरीकडे टँकर माफियांकडून होणारी आर्थिक लूट यामुळे रहिवासी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.
भांडुप जलाशयातून धारावी परिसराला पाणीपुरवठा होतो. सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान दिवसातून एकदा कधीही पाणीपुरवठा होतो. अनधिकृत जोडण्या वाढल्या असून, त्यांची संख्या सुमारे ५० टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कमी दाबाने पुरवठा होत आहे. गटर गल्ली आणि राजीव गांधी नगरसह विविध भागांत अनेकदा सलग तीन ते चार दिवस पाणी येत नाही. त्यामुळे रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहायला लागत असून, टँकरचालक अव्वाच्या सव्वा पैसे घेत आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्यांचा रहिवाशांना सामना करावा लागत आहे.
बेकायदा विक्रीधारावीतील म्हाडा, एसआरए आणि खासगी इमारती तसेच घरांना पालिकेकडून नियमित पाण्याचे बिल येते. मात्र, एका रहिवाशाकडे पालिकेची नळजोडणी आणि मीटर असेल, तर तो त्या जोडणीतून अनेकांना पाणी पुरवून त्यांच्याकडूनही पैसे घेत असल्याचे काही रहिवाशांनी सांगितले.
गटाराखालून पाइपलाइन नळाला काही तासांसाठी पाणी येत असून, ते किमान पाच कुटुंबांना एकत्र येऊन भरावे लागते. घरातील जवळपास ७० टक्के जागा पाण्याचे पिंप आणि हंडे यांनी व्यापली आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमधून गळती होते. अनेकदा त्या गटारांखालूनच घरात येतात. पाण्याचा दाब कमी आहे. त्यामुळे टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, टँकर माफिया अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत. अनेक दशकांपासून असेच जगत आहोत, असे ९० फूट रस्ता येथील रहिवासी निजाम खान यांनी सांगितले.
दुर्गंधी आणि ई-कोलाय पाणी गळती आणि बॅक्टेरियायुक्त दूषित पाणीपुरवठा ही नित्याचीच बाब असल्याचे झोपडपट्ट्यांमध्ये काम करणाऱ्या ‘वॉटरवाला’ या संस्थेने अहवालात नोंदवले आहे. त्याचबरोबर निकृष्ट पायाभूत सुविधांमुळे गढूळ पाणी, दुर्गंधी आणि ई-कोलाय या सारखे हानिकारक जीवाणू पाण्यात आढळल्याचे संस्थेने अहवालात अधोरेखित केले आहे.
जल-मलवाहिन्या शेजारी-शेजारीचअरुंद गल्ल्या आणि दाट वस्तीमुळे जल आणि मलवाहिन्या अनेक ठिकाणी एकमेकांच्या शेजारी टाकण्यात आले आहेत. परिणामी रहिवासी विविध जलजन्य आजारांना बळी पडतात, असे निरीक्षण ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस’च्या तज्ज्ञांनी नोंदवले आहे. पालिकेने मुबलक आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, याकडे संस्थेने लक्ष वेधले आहे.