उरणमध्ये कंटेनर यार्डचे पेव!

By Admin | Updated: June 16, 2015 22:40 IST2015-06-16T22:40:57+5:302015-06-16T22:40:57+5:30

उरण परिसरात सिडको, महसूल विभाग आणि खासगी जागांवर अनधिकृत कंटेनर यार्डचे पेव फुटले आहे. शासनाची परवानगी

The container yard episode in Uran! | उरणमध्ये कंटेनर यार्डचे पेव!

उरणमध्ये कंटेनर यार्डचे पेव!

मधुकर ठाकूर , उरण
उरण परिसरात सिडको, महसूल विभाग आणि खासगी जागांवर अनधिकृत कंटेनर यार्डचे पेव फुटले आहे. शासनाची परवानगी न घेता आणि आपत्कालीन कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध करून न घेताच परिसरात अनेक कंटेनर यार्ड उभे आहेत. या अनधिकृत कंटेनर यार्डमुळे अपघात, दुर्घटनेसारख्या घटनांमुळे परिसर दिवसेंदिवस धोकादायक होऊ लागला आहे.
उरण परिसरात जेएनपीटी बंदराची निर्मिती झाल्यापासून विकासाला गती प्राप्त झाली आहे. येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध बंदरांमुळे कंटेनर आयात - निर्यातीच्या व्यवसायात प्रचंड वाढ होत चालली आहे. कंटेनर हाताळणीचा धंदा प्रचंड नफ्यात असल्याने परिसरात कंटेनर साठवणुकीसाठी अनेक गोदामे, कंपन्यांची मोठ्या प्रमाणात उभारणी होऊ लागली आहे. जेएनपीटीने खासगीकरणातून आणखी दोन बंदरे उभारली आहेत. या तिन्ही बंदरातून वर्षाकाठी ६० लाख कंटेनर्सची जगभरात आयात - निर्यात केली जाते. जेएनपीटीने सध्या अस्तित्वात असलेल्या तीनही बंदरांपेक्षा कंटेनर हाताळणीच्या दुप्पट क्षमतेचे चौथे बंदर उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे जेएनपीटी बंदरातून येत्या दोन - तीन वर्षांत वर्षाला एक कोटी कंटेनरची आयात - निर्यात होण्याची शक्यता आहे.
परिसरात कंटेनर हाताळणीचा व्यवसाय प्रचंड तेजीत असल्याने सीएफएस, सीडब्ल्यूसी व इतर कंटेनर हाताळणी करणाऱ्या विविध कंपन्यांची सुमारे ७० ते ८० गोदामे परिसरात उभारण्यात आली आहेत. त्यापैकी सिडकोच्या हद्दीतच जासई, चिर्ले, पागोटे, धुतूम, पौंडखार, बेलोंडेखार येथे अनेक अनधिकृत कंटेनर यार्ड उभारण्यात आले आहेत.
अधिकृत आणि अनधिकृत कंटेनर गोदामात आयात - निर्यातीसाठी पाठविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या मालाचा साठा केला जात आहे. यामध्ये घातक रासायनिक द्रव्य, धोकादायक ज्वलनशील पदार्थ आणि इतर मालाचा समावेश असतो. मात्र अनधिकृत कंटेनर यार्डमध्ये एखादा अपघात अथवा आगीसारखी दुर्घटना घडल्यास कंटेनर यार्डमध्ये कोणत्याही उपाययोजनेची तजवीज केलेली नसते. तसेच खबरदारीच्याही उपाययोजनेसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतात. थोडक्यात आपत्कालीन यंत्रणाच नसल्याने मात्र दुर्घटनेची संख्या वाढली आहे. उरण परिसरातील अनधिकृत कंटेनर यार्डंना नोटिसाही बजावल्या जातात. त्यानंतर काही कंटेनर यार्डवर तात्पुरत्या दंडात्मक कारवाया केल्या जातात. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने कंटेनर यार्डधारकांना शासकीय यंत्रणेचे भयच उरले नाही.

कंटेनर यार्डमालकांवर कठोर कारवाईची गरज
उरण परिसरात सिडकोच्या हद्दीत २० पेक्षाही अधिक कंटेनर यार्ड आहेत. त्यामध्येही अधिकृत किती अनधिकृत किती कंटेनर यार्ड आहेत, त्याचा थांगपत्ता दस्तुरखुद्द सिडकोच्या अधिकाऱ्यांनाही नाही.
सिडकोच्या सर्व्हे अ‍ॅण्ड प्लॅनिंग विभागाच्या प्रमुख अपर्णा वेदूला यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, परिसरातील कंटेनर यार्डबाबत सर्व्हे करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर महसूल विभागाच्या हद्दीत ४५ कंटेनर यार्ड असून त्यापैकी १६ कंटेनर यार्ड अधिकृत असल्याची माहिती उरण तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली.
अनधिकृत कंटेनर यार्डवर दरवर्षी दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहितीची तहसील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. वनविभागाच्या जागेतही अनेक कंटेनर यार्ड आहेत. मात्र त्यापैकी एकही अनधिकृत कंटेनर यार्ड नसल्याचा दावा आरएफओ सी.व्ही.मराडे यांनी दिली.

Web Title: The container yard episode in Uran!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.