साथीचे आजार आटोक्यात!
By Admin | Updated: August 13, 2014 02:05 IST2014-08-13T02:05:42+5:302014-08-13T02:05:42+5:30
जुलै महिन्यात मुंबईत सुरू झालेल्या पावसामुळे रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झालेली दिसत होती

साथीचे आजार आटोक्यात!
मुंबई : जुलै महिन्यात मुंबईत सुरू झालेल्या पावसामुळे रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झालेली दिसत होती. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्यामध्ये होणारे साथीचे आजार आटोक्यात आल्याचे चित्र असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातून स्पष्ट करण्यात आले. तर दुसरीकडे तापाच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे.
१० आॅगस्टपर्यंत मुंबईमध्ये एकूण १ हजार ७३३ तापाचे रुग्ण आढळलेले असून मलेरियाचे २३५ रुग्ण आढळलेले आहेत. जुलै महिन्यात तापाचे एकूण ७ हजार ५४० रुग्ण आढळून आले होते, तर मलेरियाचे ८४८ रुग्ण आढळून आले होते. जुलै २०१३ मध्ये मलेरियाचे १ हजार २६२ रुग्ण आढळून आले होते. त्याच्या तुलनेत यंदा मलेरियाचे कमी रुग्ण आढळून आले आहेत.
दूषित पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रोचे (१० आॅगस्टपर्यंत) २९२ रुग्ण आढळून आले आहेत, तर डेंग्यूचे फक्त १८ रुग्ण आढळून आले आहेत. जुलै २०१४ मध्ये डेंग्यूचे ५२ रुग्ण आढळून आले होते. जुलै २०१४ मध्ये हेपिटायटिसचे १७६ रुग्ण आढळून आले होते, तर १० आॅगस्टपर्यंत ३९ रुग्ण आढळून आले आहेत.
टायफॉइडचे ३५, लेप्टोचे ४ आणि कॉलराचा १ रुग्ण आढळून आला आहे. स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यंदाच्या पावसाळ्यात चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. गेल्या वर्षी जुलै महिन्यात चिकनगुनियाचे ६ रुग्ण आढळून आले होते.