अनावश्यक शौचालयाचे बांधकाम
By Admin | Updated: October 22, 2014 22:54 IST2014-10-22T22:54:44+5:302014-10-22T22:54:44+5:30
येथील स्कायवॉकखाली असलेल्या बसथांब्याजवळ पालिकेने ३ वर्षांपूर्वी दिलेल्या परवानगीनंतर शौचालयाचे बांधकाम ठेकेदारामार्फत नुकतेच सुरु केले आहे़

अनावश्यक शौचालयाचे बांधकाम
राजू काळे, भार्इंदर
येथील स्कायवॉकखाली असलेल्या बसथांब्याजवळ पालिकेने ३ वर्षांपूर्वी दिलेल्या परवानगीनंतर शौचालयाचे बांधकाम ठेकेदारामार्फत नुकतेच सुरु केले आहे़ मात्र, या बसथांब्यापासून हाकेच्या अंतरावर अगोदरच एक शौचालय बांधले असताना नवीन शौचालयाच्या निर्मितीला येथील नागरीकांसह प्रवाशानी तीव्र विरोध दर्शविला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे पालिकेने ही परवानगी जनसेवा सुविधा या संस्थेला २६ एप्रिल २०११ मध्ये दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून शौचालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली नसतानाही पालिकेने, देण्यात आलेली परवानगी अद्याप रद्द केलेली नाही. याउलट त्याजागी बसथांबा सुरु करुन प्रवाशांची सोय केली असताना आता त्यांच्या आरोग्यावरच घाला घालण्याचा डाव साधला आहे. पालिकेच्या या गलथान कारभारावर प्रवाशांसह तेथील स्थानिकांत तीव्र नाराजी पसरली असून बसथांब्याजवळ शौचालय सुरु झाल्यास आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने त्या या बांधकामाला विरोध दर्शविण्यात येत आहे.
या विरोधात पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर सध्या नवीन शौचालयाचे बांधकाम थांबविण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले असले तरी ते पुन्हा सुरु होणार असल्याने प्रवाशांसह स्थानिकांनी त्याविरोधात आंदोलनाची तयारी केली आहे.