Join us

‘बीडीडी’च्या इमारतींचे बांधकाम होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 15:31 IST

वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव, दादर येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे हाती घेण्यात आलेले काम जोरात सुरू असल्याचा दावा म्हाडाकडून केला जात असतानाच येथील रहिवाशांकडून उत्तम सहकार्य मिळत आहे.

मुंबई : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प गतिमान होत असून, पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या सेक्शनमधील सहा इमारतींचे बांधकाम सुरू करण्यासाठी साने गुरुजी मैदान येथील मोकळ्या जागेवर बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला असून, बीडीडी चाळ क्रमांक १०४, १०८, १०९ तसेच ९०, ९१, ९२, ९३ मधील सर्व रहिवाशांना या कामी सहकार्य केले आहे.

वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव, दादर येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे हाती घेण्यात आलेले काम जोरात सुरू असल्याचा दावा म्हाडाकडून केला जात असतानाच येथील रहिवाशांकडून उत्तम सहकार्य मिळत आहे. अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीकडून याबाबत सातत्याने म्हाडासोबत बैठका घेतल्या जात असून, रहिवाशांना माहिती दिली जात आहे. 

आता लवकरच इमारत क्रमांक १०४, १०८, १०९  मधील रहिवाशांसोबत करार करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांचे स्थलांतर करण्यात येईल. नंतर इमारत क्रमांक ९०, ९१, ९२, ९३ आणि १०३ मधील रहिवाशांची लॉटरी काढून त्यांच्यासोबत करार करण्यात येतील.

वरळी बी डी डी चाळ क्रमांक ९०, ९१, ९२, ९३ आणि १०३ मधील रहिवाशांचे म्हाडामार्फत साइट ऑफिस बीडीडी चाळ क्रमांक २८, २९ जवळ फॉर्म स्वीकारणे सुरू आहे. 

तसेच ज्यांची घरे अनिर्णित आहेत; त्याबाबत संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागास हस्तांतरणासाठी सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सरचिटणीस किरण माने यांनी दिली.

टॅग्स :मुंबई