Join us  

धानाच्या तणसापासून इथनॉलची निर्मित्ती, विदर्भात 1500 कोटींचा मोठा प्रकल्प 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 9:10 PM

जिल्हाधिकारी यांनी जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करून ती जमीन प्रकल्पास देण्याबाबत निर्णय झाला.

मुंबई - भंडारा येथे धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीच्या प्रकल्प उभारणी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री साबांवि, वने व आदिवासी विकास, परिणय फुके, भूषण गगराणी (मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव), शोभाताई फडणवीस,  जिल्हाधिकारी भंडारा शंतनू गोयल, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधीकारी अन्बलगन, मिलिंद पतके कार्यकारी संचालक (भारत पेट्रोलियम) हे उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्पाला जमीन उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 

जिल्हाधिकारी यांनी जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करून ती जमीन प्रकल्पास देण्याबाबत निर्णय झाला. हा प्रकल्प 1500 कोटींचा असून याला 100 एकर जमीन लागणार आहे. भविष्यकालीन तरतूद म्हणून अधिकची जमीन मागणी करणे व उपलब्ध करून देणे याबाबत सूचना देण्यात आल्या. यासाठी एमआयडीसी सर्व सहकार्य करणार आहे. यातून बायोगॅस निर्मिती होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा या प्रकल्पाद्वारे होणार आहे. भंडारा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असून परिणय फुके यांनी यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. या स्वरूपाचे भारतात 12 प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी 4 प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. या प्रकल्पास जनावरांचा चारा वगळून मोठ्या प्रमाणात तणस उपलब्ध आहे. 3.84 लाख टन तनस भंडारा जिल्ह्यात तर गोंदिया जिल्ह्यात 3.46 लाख टन तनस उपलब्ध आहे. हे सर्व जाळल्या जात असून आता त्यापासून इथेनॉल व गॅसची निर्मिती होईल. तणसाची बांधणी करणे मशीनच्या सहाय्याने प्रेस करून बेल्स बनवणे यासारखे आनुषंगिक उद्योगही उभे राहणार असल्याने स्थानिकांच्या रोजगारात भर पडेल. या प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान भारत पेट्रोलियम उपलब्ध करून देणार आहे. शेल टेक्नॉलॉजीचा उपयोग करून इतरही कृषी व वने यातून उत्पन्न होणाऱ्या वेस्टपासूनसुद्धा इथेनॉल निर्मित केल्यास इथेनॉल कमी किमतीत उपलब्ध होईल, असे मंत्री परिणय फुके यांनी केली. 

परिणय फुके पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून गती मिळालेल्या या प्रकल्पाबाबत जनतेत उत्साह असून उद्योग व रोजगार क्षेत्रात मोठ्या संधी भंडारा जिल्ह्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्यात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभंडाराशेतकरी