Join us  

Sanjay Raut: कर्नाटकात बोलावून माझ्यावर हल्ल्याचा कट, संजय राऊतांचा आरोप; थेट अमित शहांना केलं आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 10:47 AM

​​​​​​​खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टानं समन्स बजावलं आहे. १ डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई-खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टानं समन्स बजावलं आहे. १ डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच मुद्द्यावर बोलताना आज संजय राऊत यांनी कर्नाटकात त्यांच्यावर हल्ल्याचा कट आखला जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. ते मुंबई प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

"कोर्टात सीमावादावर सुनावणी, मग कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जतमधील गावांवर दावा, काल कर्नाटकातील एका संघटनेनं महाराष्ट्रातील गावात येऊन झेंडे फडकावले आणि मला आलेले समन्स. यामागची क्रोनोलॉजी समजून घेण्यासारखी आहे. कर्नाटकात मला बोलावून माझ्यावर हल्ल्याचा कट आखला गेला आहे. माझ्या अटकेची तयारी केली जात आहे. पण मी घाबरणारा नाही. मी तिथं जाणार", असं संजय राऊत म्हणाले. 

अमित शाहांनी लक्ष द्यावं"आमच्या काश्मीरमध्ये येऊन परकीय शक्तींनी ज्यापद्धतीनं झेंडे फडकावले. त्याच पद्धतीनं कर्नाटकातील संघटनांचे लोक महाराष्ट्रात घुसत आहेत. यांच्यावर खरंतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. हीच परिस्थिती जर कायम राहिली तर इथंही रक्तरंजित युद्ध देशाच्या गृहमंत्र्यांना हवं आहे का? माझं अमित शाह यांना आवाहन आहे की त्यांनी यात लक्ष घालावं नाहीतर परिस्थिती बिघडेल", असं संजय राऊत म्हणाले. 

आता काश्मीर 'फाइल्स-२' काढा'काश्मीर फाइल्स' चित्रपट प्रोपगंडा असल्याचं विधान इफ्फीच्या प्रमुख ज्युरींनी केलं आहे. यावरुनही आता वाद निर्माण होत आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनीही काश्मीर फाइल्स चित्रपट एका पक्षाच्या प्रचारासाठी आणि एका पक्षाच्या विरोधात केला गेला होता, असं विधान केलं आहे. "काश्मीर फाइल्स चित्रपटासाठी कोण प्रमोशन करत होतं हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे तो प्रोपगंडा असल्याचं कुणी नाकारणार नाही. ज्या काश्मीरी पंडितांवर हा सिनेमा केला गेला. खरंतर या सिनेमाच्या प्रदर्शनानंतरही काश्मीरी पंडितांच्या हत्या वाढल्या. त्यावर हे काश्मीरी फाइल्सवाले काही बोलले नाहीत. आता त्यावर काश्मीर फाइल्स-२ सिनेमा काढा. आता का गप्प आहात", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊत