Join us  

मनसेच्या इशाऱ्यानंतर दुचाकी खरेदीदारांनाही दिलासा, 6 महिने बाऊन्सेस चार्ज माफ 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 5:01 PM

टाळेबंदीच्या कठोर अंमलबजावणीमुळे राज्यातील रिक्षा मालकांना पाच महिने कोणत्याही प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते. अशा स्थितीत रिक्षासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता

ठळक मुद्देमनबा फायनान्स या दुचाकी खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सहा महिन्यांसाठी बाऊन्सिंग चार्जेस (मासिक प्रत्येकी रु 826) माफ केले आहेत.

मुंबई - केंद्र सरकार तसंच राज्य सरकारने करोनानिर्मित आर्थिक संकटात रिक्षाचालकांना कोणताही आर्थिक दिलासा दिला नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कर्जधारकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे दिलासा मिळाला आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर बजाज फायनान्सने १,१९,७४३ रिक्षा कर्ज ग्राहकांना आर्थिक दिलासा दिला होता. त्यानंतर, आता मनबा फायनान्स या दुचाकी खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थेने मनसेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सहा महिन्यांसाठी बाऊन्सिंग चार्जेस (मासिक प्रत्येकी रु 826) माफ केले आहेत. 

टाळेबंदीच्या कठोर अंमलबजावणीमुळे राज्यातील रिक्षा मालकांना पाच महिने कोणत्याही प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते. अशा स्थितीत रिक्षासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता आणि अशा अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडे आल्या होत्या. यासंदर्भात बजाज कंपनीकडून रिक्षा कर्ज ग्राहकांना सहकार्य व्हावे, यासाठी मनसेने आधी बजाज कंपनीशी पत्रव्यवहार केला आणि नंतर गोरेगाव येथील बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक देऊन रोखठोक इशारा दिला. यानंतर बजाज फायनान्सचे वरिष्ठ अधिकारी आणि मनेसेचे संजय नाईक, कीर्तिकुमार शिंदे यांच्यात चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. या चर्चेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुचवलेली योजना बजाज फायनान्सने मान्य केली. सोमवारी संध्याकाळी उशीरा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी योजनेचे लेखी पत्र मनसेला दिले. त्यानंतर, आज मनबा फायनान्सनेही दुचाकीधारकांना दिलासा देत, हफ्त्यात सवलत दिली आहे.

मनबा फायनान्स या दुचाकी खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सहा महिन्यांसाठी बाऊन्सिंग चार्जेस (मासिक प्रत्येकी रु 826) माफ केले आहेत. याचा लाभ एकूण 12,843 ग्राहकांना (सहा महिन्यांसाठी प्रत्येकी रु 4,956) होणार आहे. मनसेमुळे प्रत्यक्षात आलेल्या या योजनेचा दुचाकीस्वारांना होणारा एकूण लाभ सुमारे रु.6 कोटी 36 लाख 49 हजार 908 इतका आहे. मनबा फायनान्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र गड या मुख्यालयात हे पत्र आणून दिले. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे तसंच सचिव सचिन मोरे उपस्थित होते. 

टॅग्स :मनसेऑटो रिक्षामुंबई