मुंबईकरांना दिलासा, विहार तलाव भरला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST2021-07-19T04:06:13+5:302021-07-19T04:06:13+5:30
मुंबई : महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा विहार तलाव हा १८ जुलै रोजी ...

मुंबईकरांना दिलासा, विहार तलाव भरला!
मुंबई : महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा विहार तलाव हा १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता भरून वाहू लागला. ५ ऑगस्ट २०२० रोजी रात्री १०च्या सुमारास विहार तलाव पूर्ण भरून वाहू लागला होता. २०१९मध्ये हा तलाव ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. २०१८मध्ये १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. २७ हजार ६९८ दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव आहे.
महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून, यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे. महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.
या तलावाचे बांधकाम १८५९मध्ये पूर्ण झाले. तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून, तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा २७,६९८ दशलक्ष लीटर एवढा असतो. तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.