Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या वाहतूककोंडीवरील उपाययोजनेसाठी ट्वीन टनेलचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 05:37 IST

मुंबईतील वाहतूककोंडी होणारी ठिकाणे आहेत तेथे ग्रेड सेपरेटर टाकून वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी मुंबई पालिकेला यावेळी निर्देश देण्यात आले.

मुंबई : मुंबईतीलवाहतूक कोंडीवरील उपाययोजनेसाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे ट्वीन टनेल या नवीन संकल्पनेचा वापर करण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात सुरू असलेले विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प, मेट्रो तसेच सिंचन प्रकल्पांना तातडीने गती देऊन हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयातील वॉर रूममध्ये राज्यातील दहा महत्त्वांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, मुंबई मेट्रो, सिंचन प्रकल्प, समृद्धी महामार्गालगत इकॉनॉमिक झोन या प्रकल्पांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही कामे वेळेत सुरू झाल्यास त्याचा राज्यातील नागरिकांबरोबरच औद्योगिक विस्ताराला तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची तातडीने पूर्तता करत प्रकल्पांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबईतील वाहतूककोंडी होणारी ठिकाणे आहेत तेथे ग्रेड सेपरेटर टाकून वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी मुंबई पालिकेला यावेळी निर्देश देण्यात आले. वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

मुंबई मेट्रो मार्गिका ४, चार ए आणि ११ साठी मोगरपाडा येथे डेपो करण्याकरिता जमीनसंपदाच्या विषयाबाबत आढावा घेण्यात आला. मिठी नदी विकास व प्रदूषण नियंत्रण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्तांना यावेळी देण्यात आल्या. ठाणे, भिवंडी, कल्याण या मुंबई मेट्रो पाचच्या मार्गिकेसाठी कशेळी येथील भूसंपादनाबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.

टॅग्स :वाहतूक कोंडीमुंबई