पाणथळी पक्षांचे संवर्धन!

By Admin | Updated: January 17, 2015 23:11 IST2015-01-17T23:11:55+5:302015-01-17T23:11:55+5:30

निसर्गाचा अविभाज्य घटक असलेल्या पक्षांचे अस्तित्त्व दिवसन्दिवस घटत आहे.

Conservation of wetlands! | पाणथळी पक्षांचे संवर्धन!

पाणथळी पक्षांचे संवर्धन!

जयंत धुळप ल्ल अलिबाग
निसर्गाचा अविभाज्य घटक असलेल्या पक्षांचे अस्तित्त्व दिवसन्दिवस घटत आहे. त्यांच्या अधिवासांवर मानवी अतिक्रमणामुळे गदा आली असल्याची खंत पक्षीमित्र संघटनेचे सदस्य, पक्षी अभ्यासक व रायगड जिल्ह्यातील ‘सिस्केप’ संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी व्यक्त केली.
पाणस्थळांवर अनेक पक्षी स्थलांतर करुन येतात आणि विसावतात. स्वच्छ पर्यावरणाचा रंग, वास, अधिवास याची इथंभूत माहिती पक्षीच आपल्याला देत असतात. साधा ‘बगळा’ आपल्याला शेती बद्दल माहिती देतो. अनेक गावांमधून पावसाळा येण्याचे अनुमान, हे बगळ्यांच्या घरटे बांधण्यावरून लावले जाते. पक्षांच्या स्थलांतरावरून ऋतुंचे अनुमान लावता येत असल्याचे मेस्त्री यांनी सांगीतले.
राज्यातील पाणस्थळांवर स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षांचा, त्यांच्या अधिवासाचा अंदाज घेण्यासाठी सनियंत्रण ठेवून काही उपाययोजनात्मक कार्यक्रम राबविणे ही काळाची गरज ओळखून वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने पाणपक्षी प्रगणना करण्याचे अध्यादेश जारी करण्यात आले. या माहितीच्या आधारे पाणस्थळांची नोंदणी करुन असे अधिवास संवर्धित करणे, हा त्यामागील हेतू आहे. २४ डिसेंबर २०१४ ते ११ जानेवारी २०१५ या कालावधीत हे काम तालुकास्तरांवर, राज्यात अनेक ठिकाणी निसर्ग अभ्यासक व सामाजिक संस्थांच्या मदतीने करण्यात आले.
महाड तालुक्यातील सीस्केप आणि सह्याद्री मित्र या निसर्गप्रेमी पक्षी संवर्धन करणाऱ्या संस्था आणि महाड-म्हसळे-श्रीवर्धन वन विभाग कर्मचारी आदींनी सहभाग घेतला. त्यांनी विविध पाणवठ्यांवर जावून निरिक्षण व छायाचित्रण करण्यात आले. यावेळी पक्षांच्या संख्येत प्रचंड घट निदर्शनास आल्याचे मेस्त्री यांनी सांगितले.
सह्याद्री मित्र महाड संस्थेच्या माध्यमातून १९९७ मध्ये महाड येथेच पक्षी मित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी १९९४ ते १९९६ पर्यंतच्या पक्षी सर्वेक्षणाची सूची प्रसिध्द् करण्यात आली होती. गेल्या दीड दशकात अनेक पक्षांच्या जाती या भागात कमी वा नामशेष झाल्याचे दिसते आहे. १९९७ साली मुग्ध बलाक, पांढऱ्या मानेचे करकोचे, गार्गेनी बदक, अडई बदक, स्पून बिल्स, ब्लॅक आयाबिस, व्हाईट आयबिस आदींची संख्या पाचशे ते त्यापेक्षा अधिक अशी होती. आज मात्र हे पक्षी एकटे-दुकटे, दहा-बाराच्या संख्येने दृष्टीस पडतात. महाड जवळच्या वीर-दासगावच्या खारपुटी गवताळ खाडीमध्ये युरोपीयन व्हाईट स्टॉर्क्स, रेड शँक, प्लोव्हर्स, स्टील्ट, सँडपायपर्स आणि स्टेप्पी इगल्स व हॅरीअर्स यांची नोंद केली गेली आहे. परंतु आता मात्र यातील एकही प्रजात इकडे फिरकलेली नाही वा दृष्टीस पडली नाही. समुद्र-खाडी मुखाकडे अधिवास असलेला ‘समुद्री गरुड’ आणि ‘आॅस्प्रे गरुड’ मात्र घिरट्या घालताना दिसतात. महाड शहरातील पाणस्थळांमधील घट हे यामागील कारण आहे. गावांगावांतील तलाव-पाणवठ्यांची माहिती लोकांनी आम्हाला दिल्यास पर्यायी पक्षी संवर्धनासाठी महत्चाची उपाययोजना करता येवू शकेल असा विश्वास मेस्त्री यांनी व्यक्त केला आहे.

निसर्गचक्रांमधील ऋतुंचा बहराचा काळ हा नवीन जीवन निर्मितीचा काळ असतो. मात्र पावसाळा सोडला तर इतर सर्व बहरांवर मानवाने संक्रांत आणल्याचे दिसते. मानवी उत्क्रांती आणि वैज्ञानिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर निसर्गांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. नदीच्या स्वच्छ पाण्याचा वापर मानवाने दैनंदिन व्यवहारात करता करता आज अशा नद्या-सरोवरांनी फुललेल्या स्वर्गीय नंदनवानाचे त्याच मानवाने गटार केले असल्याचे दिसून येते. हवा-पाणी-जमीन या मुलभूत मानवी गरजाना मानवच संपवित चालला. नद्या, सरोवरे, मोठ्या नद्या, खाडी, त्रिभूज प्रदेश, मोठे तलाव, धरण, दलदलीचा भाग, समुद्र किनारे, झिलाणी, चिखलाणी, खाजण, आणि धबधबा अशा पक्षांच्या वैविध्यपूर्ण नैसर्गीक ‘पाणस्थळ’अधिवासांवर विपरित परिणामा होवून ते कमी वा नामशेष होवू लागले असल्याचे पक्षी संशोधक मेस्त्री यांचे निरिक्षण आहे.

Web Title: Conservation of wetlands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.