Join us  

मोनोची महालक्ष्मी रेल्वे आणि मेट्रो स्थानकाला जोडणी, एमएमआरडीए ‘ट्रॅव्हलेटर’ उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 9:57 AM

विमानतळावर असलेला सरकता जिना (ट्रॅव्हलेटर) आता मोनो आणि मेट्रो स्थानकांच्या दरम्यानही पाहायला मिळणार आहे.

मुंबई : विमानतळावर असलेला सरकता जिना (ट्रॅव्हलेटर) आता मोनो आणि मेट्रो स्थानकांच्या दरम्यानही पाहायला मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मोनो रेल्वेच्या संत गाडगे महाराज चौक या शेवटच्या स्थानकाची पश्चिम उपनगरीय रेल्वेवरील महालक्ष्मी स्थानकाशी आणि मुंबई मेट्रो ३ मार्गिकेशी जोडणी देण्यासाठी ‘ट्रॅव्हलेटर’ बसविण्यात येणार आहे. त्याची उभारणी डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. मात्र एमएमआरडीएला या स्कायवॉकच्या उभारणीआड येणारी ८९ झाडे हटवावी लागणार असून यातील काही झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.

चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणाऱ्या मोनो मार्गिकेची लांबी सुमारे २० किमी आहे. मोनो मार्गिकेच्या शेवटच्या स्थानकापासून पश्चिम उपनगरीय रेल्वेचे महालक्ष्मी स्थानक ७०० मीटर अंतरावर आहे. हे अंतर जास्त असल्याने ते चालणे नागरिकांना शक्य होत नाहीत. त्यामुळे मोनो रेल्वेने प्रवास करून महालक्ष्मी स्थानकावर येऊन पुढे दक्षिण मुंबई अथवा विमानतळाकडे जाण्यासाठी प्रवासी उत्सुक नसतात. त्यातून मोनो रेल्वेला स्कायवॉकद्वारे जोडणी दिल्यास प्रवाशांना मोनोने प्रवास करून महालक्ष्मी स्थानकावर अथवा मेट्रो ३ मार्गिकेच्या स्थानकावर पोहोचणे शक्य होईल. 

   मोनोच्या प्रवासी संख्येतही वाढ होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

 याबाबत फुट ओव्हरब्रीजच्या उभारणीसाठी झाडांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. 

 एमएमआरडीएकडून कमीत कमी झाडे तोडावी लागतील यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.

चालण्याचे अंतर होणार कमी :

आता एमएमआरडीएकडून सुमारे ४०५ मीटर लांबीचा स्कायवॉक उभारला जाणार आहे. यातील काही भाग सरकत्या जिन्याचा असेल. त्यातून प्रवाशांचे चालण्याचे अंतर कमी होणार आहे. या स्कॉयवॉकची रुंदी ४ ते ७ मीटर असेल. त्यासाठी सुमारे ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२४ पर्यंत उभारण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.

टॅग्स :मुंबईमोनो रेल्वेएमएमआरडीए