Join us  

केंद्राच्या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी किसान मजदूर बचाओ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 8:54 PM

उद्या शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी राज्यात शेतकरी मजूर बचाओ दिवस पाळण्यात येणार असून राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी सकाळी १० वाजल्यापासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबई- केंद्रातील भाजपा सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर घेतली. हा शेतक-यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा डाव आहे. काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्याविरोधात राज्यविरोधी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून उद्या शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी राज्यात शेतकरी मजूर बचाओ दिवस पाळण्यात येणार असून राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी सकाळी १० वाजल्यापासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे लासलगाव जिल्हा नाशिक येथे आंदोलनात सहभागी होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे बैलगाडी लाँग मार्च आयोजित करण्यात आला आहे.  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड हे मुंबई येथे धरणे आंदोलन करणार आहेत.गुजरातचे प्रभारी खा. राजीव सातव हे हिंगोली येथे आंदोलनात सहभागी होणार आहेत. अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली वर्धा येथे आंदोलन करण्यात येणार आहे. नंदुरबार येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर येथील गांधी चौकात काळ्या कायद्याविरोधात आंदोलन करणार आहेत. गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे कोल्हापूर येथे आंदोलन करणार आहेत. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली मार्केट यार्ड  येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :काँग्रेस