काँग्रेस कांदिवलीचा बालेकिल्ला राखणार का?
By Admin | Updated: October 13, 2014 04:15 IST2014-10-13T04:15:34+5:302014-10-13T04:15:34+5:30
कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. उत्तर भारतीय मतदारांचे वर्चस्व असलेला कांदिवली पूर्व मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे

काँग्रेस कांदिवलीचा बालेकिल्ला राखणार का?
सायली कडू, मुंबई
कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. उत्तर भारतीय मतदारांचे वर्चस्व असलेला कांदिवली पूर्व मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. २००९ सालच्या निवडणुकीत काँग्रेसच्या रमेशसिंग ठाकूर यांनी भाजपाच्या जयप्रकाश ठाकूर यांना ११ हजार मतांच्या फरकाने धूळ चारली होती. मात्र त्या वेळी काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ होती. या वेळी काँग्रेसविरोधात शिवसेनेसोबत भाजपा पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उतरली आहे. त्यामुळे ठाकूर यांना चहुबाजूंनी विरोधकांचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रवादीचे श्रीकांत मिश्राही निवडणुकीच्या रिंगणात ठाकूर यांच्याविरोधात उतरले आहेत. त्यामुळे ठाकूर यांना या निवडणुकीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. एकीकडे ठाकूर यांना शिवसेनेचे अमोल कीर्तिकर आणि भाजपाच्या अतुल भातखळकर यांचे कडवे आव्हान आहे, तर दुसरीकडे मराठी माणसांसाठी लढणाऱ्या मनसेच्या अखिलेश चौबे या उत्तर भारतीय उमेदवाराची टक्कर आहे. परिणामी ठाकूर यांना एकाच वेळी तब्बल चार मातब्बर पक्षांच्या नेत्यांचा सामना करावा लागणार आहे. तर समाजवादी पार्टीकडून राजेश साळवे या वेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
एकंदरीतच उत्तर भारतीय मतदारांचा बोलबाला अधिक असला तरीही येथे तीन अमराठी उमेदवार व तीन मराठी उमेदवारांमध्ये ही लढाई रंगत आहे. मराठीच्या मुद्द्याला धरून राज ठाकरे यांनी पहिली सभा कांदिवली मतदारसंघातच घेतली व येथे त्यांनी उत्तर भारतीयांवरच तोफ डागली असल्याने चौबे यांच्या पारड्यात कितपत मते पडतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
सर्वात तरुण मतदार म्हणून चौबे यांना मत मिळण्याची आशा शिवसेनेच्या अमोल कीर्तिकर यांच्यामुळे फोल ठरेल का, असा सवालही निर्माण झाला आहे. शिवाय गेल्या निवडणुकीत भाजपाच्या अतुल भातखळकर यांचे नाव चर्चेत असतानाच ऐन वेळी जयप्रकाश ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली होती. भातखळकर यांनी या मतदारसंघात कोणतीही छाप सोडतील, अशी कामे केलेली नाहीत.
अनेक कामे केल्याचा दावा ठाकूर करत असले, तरीही सोसायट्यांना लागणारे डिम्ड कन्व्हेअन्स या कळीच्या मुद्द्यावरून विरोधक ठाकूर यांना घेरण्याची शक्यता आहे. शिवाय झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे अनेक झोपडपट्टीधारक बेघर झाल्याची आरोळी विरोधकांमधून ठोकली जात आहे. लोखंडवाला येथील मोठे क्रीडांगण अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असून त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. आकुर्ली रोडची ट्रॅफिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे.