Join us  

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 11:36 AM

Congress News: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत वारंवार काँग्रेसने दिले आहेत. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर चाचपणी देखील करण्यात आली. २०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या संख्याबळात घट झाली.

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत वारंवार काँग्रेसने दिले आहेत. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर चाचपणी देखील करण्यात आली. २०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या संख्याबळात घट झाली. काँग्रेसचे जेमतेम २९ नगरसेवक महापालिकेत आहेत. मात्र भाजप दुसरा मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षनेते पदाची संधी काँग्रेसकडे चालून आली. विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपने न्यायालयाचे द्वारही ठोठावले. मात्र अखेर कौल काँग्रेसच्या बाजूने लागला. परंतु, फेब्रुवारी २०२२ मध्ये संभाव्य पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. यासाठी प्रभागस्तरावर चाचपणी सुरू असून काँग्रेसचे बळ वाढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

काँग्रेसचे २९ नगरसेवक२०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. काँग्रेसचे संख्याबळ मागील काही वर्षांमध्ये निम्म्यावर आले आहे. सध्या केवळ २९ नगरसेवक निवडून आल्याने काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे.

प्रभाग समित्यांमध्ये निर्णायककाँग्रेसचे संख्याबळ भाजपच्या तुलनेत निम्म्यावर आहे. मात्र राज्यात एकत्र असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुंबई महापालिकेतील प्रभाग समित्यांमध्ये कधी गैरहजेरी तर कधी तटस्थ राहून शिवसेनेलाच सहकार्य केले. त्यामुळे १२ प्रभाग समित्यांचे अध्यक्ष पद शिवसेनेच्या ताब्यात आले.

विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेकोणत्याही समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे नसले तरी मुंबई महापालिकेतील प्रतिष्ठेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे आहे. ८३ संख्याबळ असल्याने भाजप विरोधी पक्षनेते पदाचे दावेदार होते. मात्र भाजपने पहारेकऱ्यांची भूमिका घेतल्यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे आले. कालांतराने भाजपने या पदावर दावा केला. मात्र विरोधी पक्षनेते पद परत मिळवण्यात भाजपला काही यश आले नाही.

लवकरच निवडणुकामुंबई महापालिकेच्या निवडणुका २०२२ मध्ये होणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेऊन नागरी समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसला स्वबळाची ताकद दाखवून द्यायची आहे.

आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्यात येणार आहे. अन्य कोणत्या पक्षाबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. याबाबत पक्षीय पातळीवर चर्चा सुरु आहे.

- रवी राजा, विरोधी पक्षनेते

टॅग्स :काँग्रेसमुंबईनिवडणूक