Join us  

शिवसेनेच्या 'मिशन गोवा'ला काँग्रेसकडून दे धक्का; राऊतांनी दिला होता भाजपाला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 9:14 AM

मात्र शिवसेनेच्या या दाव्यानंतर गोव्यातील काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी गोवामधील भाजपा सरकारला धक्का देणारं विधान केलं होतं. लवकरच गोवामध्ये राजकीय भूकंप घडेल असा इशारा देत उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई हे समर्थक आमदारांसह शिवसेनेच्या संपर्कात असून भाजपाविरोधी सरकार गोव्यात येईल असा दावा केला होता. 

मात्र शिवसेनेच्या या दाव्यानंतर गोव्यातील काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपा सरकार पाडण्यासाठी कोणत्याही आघाडीसाठी आम्ही प्रयत्नशील नाही. महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात सरकार स्थापन केले. त्याचे पडसाद राष्ट्रीय राजकारणातही उमटतील असं सांगितले जात होतं. गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडनकर म्हटलं की, काँग्रेस पक्ष सरकार पाडण्यासाठी सत्ताधारी आमदारांचा घोडेबाजार करण्यापेक्षा विरोधी बाकांवर बसणं पसंत करेल. 

शुक्रवारी सकाळी संजय राऊत यांनी ट्विट करुन सांगितलं होतं की, आम्ही बुद्धिबळात अशी कमाल करतो की, प्यादाही राजाला मात करतो. त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की, गोव्याचे विजय सरदेसाई यांच्याकडे ३ आमदार आहेत, भाजपात गेलेले काँग्रेसचे आमदारही संपर्कात आहेत, मगो 1 आमदार संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितले. गोव्यात भाजपाविरोधात शिवसेना आघाडी उघडणार आहे, पर्रिकरांच्या मंत्रिमंडळात राहिलेले विजय सरदेसाई यांच्या समर्थक आमदारांसह शिवसेनेशी आघाडी करणार असल्याचं ते म्हणाले. तसेच भाजपा सरकार धोक्यात येईल फक्त गोव्यातच नव्हे तर देशभरात भाजपाविरोधात आघाडी उघडण्यात येणार असल्याचंही संजय राऊतांनी सांगितले होतं. 

गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, मला गोव्यात भाजपा सरकार कोसळलेलं पाहायला आवडेल. मात्र त्याची शक्यता फार कमी दिसते. ४० सदस्यांपैकी ३० सदस्य भाजपाच्या बाजूने आहेत. त्यामुळे सरकार पाडण्यापेक्षा विरोधात बसण्याची प्राथमिकता असेल. तर संजय राऊत यांच्या विधानावर भाजपा नेते विनय तेंडुलकर यांनी टोला लगावला आहे. संजय राऊतांनी स्वप्न पाहणं बंद करावं. महाराष्ट्रात जिथे तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केलं आहे. तिथे जनतेला दिलेली आश्वासन तुम्ही पूर्ण करा. दिवसा-ढवळ्या स्वप्न पाहू नका असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनागोवा