महापौर बंगल्यातील स्मारकाला काँग्रेसचा विरोध
By Admin | Updated: November 19, 2015 02:49 IST2015-11-19T02:49:06+5:302015-11-19T02:49:06+5:30
महापौर निवासाच्या जागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यास मुंबई काँग्रेसनेही विरोध दर्शविला असून, या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

महापौर बंगल्यातील स्मारकाला काँग्रेसचा विरोध
मुंबई : महापौर निवासाच्या जागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यास मुंबई काँग्रेसनेही विरोध दर्शविला असून, या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. महापौर निवास ही ऐतिहासिक वारसा असणारी वास्तू असून, त्याचे स्मारकात रूपातंर करू नये. शिवसेनेच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर बंगल्यात स्मारक उभारण्याची घोषणा केली, असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.
निरुपम म्हणाले की, शिवसेनाला बाळासाहेबांचे स्मारक उभारायचे असेल तर त्यांनी स्वत:च्या खर्चातून स्मारक उभारावे. त्यासाठी करदात्यांचा पैसा वापरू नये. मुंबईतील मोकळ्या जागांच्या देखभालीसाठी १०८ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मुंबई महापालिकेला १०८ कोटी ही मोठी रक्कम नाही. तरीही देखभालीच्या नावाखाली खासगी संस्थांना या जमिनी देण्याचा घाट नवीन धोरणात आखण्यात आला आहे. खासगी संस्थांच्या माध्यमातून मुंबईतील मोकळ्या जमिनी शिवसेना-भाजपा नेत्यांच्या घशात घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप निरुपम यांनी यावेळी केला. २००७ साली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात देखभालीच्या नावाखाली मुंबईतील मोकळ्या जागा खासगी संस्थांना बहाल करण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही अनधिकृतपणे शिवसेना-भाजपावाल्यांनी अनेक जागांवर कब्जा केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई काँग्रेस या मुद्द्यावर जोर देणार असल्याचेही निरुपम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)