काँग्रेस, मनसेची धडक; सेनेचा ‘बुरूज’ ढासळला
By Admin | Updated: February 25, 2017 03:45 IST2017-02-25T03:45:06+5:302017-02-25T03:45:06+5:30
महापालिका निवडणुकीत शिवसेना मोठा पक्ष ठरला आहे. मात्र अनेक दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे वाघाची ‘डरकाळी’ ऐकिवात नाही

काँग्रेस, मनसेची धडक; सेनेचा ‘बुरूज’ ढासळला
मुंबई : महापालिका निवडणुकीत शिवसेना मोठा पक्ष ठरला आहे. मात्र अनेक दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे वाघाची ‘डरकाळी’ ऐकिवात नाही. महापालिका एल वॉर्डमधील १६ प्रभागांमध्ये काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धडेकेने शिवसेना गडाचा बुरूज ढासळला आहे.
चुनाभट्टी, कुर्ला पूर्व-पश्चिम, चांदिवलीतील काही भाग हा महापालिकेतील एल वॉर्डमध्ये येतो. सेनेच्या उमेदवारांनी प्रयत्न करूनही काँग्रेस, मनसे पुढे राहिली. युतीसाठी ‘सात’ कॉल केलेल्या मनसेला या परिसरातील मतदारांनी ‘साथ’
दिली. प्रभाग १५६ मध्ये
अश्विनी माटेकर, प्रभाग १६३ मध्ये दिलीप लांडे आणि प्रभाग १६६ मध्ये संजय तुर्डे यांनी विजय मिळवला. या पराभवाने सेनेच्या गडाला
खिंडार पडण्यास सुरुवात झाली. प्रभाग १६६ मधील सेनेच्या नगरसेविका मनाली तुळसकर यांना हार पत्करावी लागली.
डॉक्टर वॉर्ड म्हणून प्रसिद्ध असलेला प्रभाग १६८ मध्ये राष्ट्रवादीच्या सईदा खान यांनी सेनेच्या अनुराधा पेडणेकर यांचा १५८३ मतांनी पराभव केला. प्रभाग १६५-१६७ मध्ये अनुक्रमे अश्रफ आझमी-दिलशाद आझमी या पती-पत्नी जोडीने बाजी मारली. काँग्रेसच्या या विजयी धडकेमुळे सेनेला अनुक्रमे चौथ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. प्रभाग १६९ मध्ये सेनेच्या प्रविणा मोरजकरने ‘पाच आकडी’ मतदान मिळवत विजय साजरा केला. कोमल जामसंडेकर, दर्शना शिंदे, एस. अण्णामलाई, नागेश लवटे या दिग्गजांचे पानिपत झाल्याने गड आला पण ‘बुरूज’ ढासळला असे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)