Join us  

राज्यात काँग्रेसचे सरकार येईल, मल्लिकार्जुन खर्गेंना आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 8:31 PM

तळागाळापर्यंत काँग्रेसचा विचार पोहोचवून काँग्रेसचे सरकार आणूः आ. बाळासाहेब थोरात

ठळक मुद्देनवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात व कार्याध्यक्षांनी स्वीकारला पदभारतळागाळापर्यंत काँग्रेसचा विचार पोहोचवून काँग्रेसचे सरकार आणूः आ. बाळासाहेब थोरात

काँग्रेस पक्षाच्या सरकारांनी महाराष्ट्र घडवला आहे. राज्यातल्या प्रत्येक गावात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. सर्वांनी एकत्रीत प्रयत्न केल्यास राज्यात नक्की काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आ, बाळासाहेब थोरात व नवनियुक्त कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, आ. बसवराज पाटील, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. यशोमती ठाकूर, मुजफ्फर हुसेन यांचा पदग्रहण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खर्गे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्वांना सोबत घेऊन चांगले काम केले. जनतेच्या प्रश्नावर आंदोलने केली प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. पण दुर्देवाने फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात अनपेक्षित निकाल लागले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीचा देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न आहे. पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. आमदार फोडायला आणि त्यांची पंचतारांकीत बडेजाव ठेवायला भाजपकडे एवढा पैसा कुठून आला? असा प्रश्न उपस्थित केला. ही लढाई फक्त निवडणुकीपुरती नसून देशाची लोकशाही व संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आहे. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई काँग्रेस पक्ष जिंकेल असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला.प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की, युपीए अध्यक्षा सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी व माझ्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवणा-या ज्येष्ठ नेत्यांचे आभार. यापूर्वी अनेक कर्तृत्वान नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष सांभाळले आहे मलाही ती संधी पक्ष नेतृत्वाने दिली आहे. गेल्या चार वर्षात राज्यातील शेतकरी,कष्टकरी, महिला, तरूण,व्यापारी, सगळेच संकटात आहेत. कर्जमाफी नाही. पीक कर्ज मिळत नाही. काँग्रेस सरकारच्या काळातील निकष या सरकारने बदलल्याने शेतक-यांना पीक विमा मिळत नाही. दुष्काळी मदत नाही. शेतीमालाला भाव नाही. कृषी क्षेत्र अडचणीत आल्यामुळे इतर क्षेत्रात मंदी आली आहे. विविध दुर्घटनांमध्ये किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. पण सरकारला याचे काही सोयरसुतक नाही. भाजप शिवसेना सरकार खोट्या जाहिरातीद्वारे लोकांची फसवणूक करत आहे. या सरकारच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करू असे

आ. थोरात म्हणाले.

सरकारविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. समाजातला एकही घटक सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. काँग्रेस पक्षाकडे कार्यकर्ते आणि नेत्यांची मोठी टीम असून सरकारचे अपयश जनतेसमोर मांडू आणि १९८० च्या विजयाची पुनरावृत्ती करू असेही ते म्हणाले. काँग्रेस विचार शाश्वत असून सर्वसामान्यांच्या अंत:करणात काँग्रेस पक्ष आहे. तळागाळातल्या या लोकांपर्यंत पोहोचू. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या असतात त्यामुळे विधानसभेला लोकसभेपेक्षा वेगळा निकाल येईल असे ते म्हणाले. काही संधीसाधू लोक पक्ष सोडून गेल्याने युवकांना मोठ्या प्रमाणात संधी आहे.  काँग्रेसमुक्त महाराष्ट्राच्या बाता मारणा-या चंद्रकांत पाटलांना स्वतःचे काय होणार ते माहित नाही? त्यामुळे त्यांनी दुस-यांबद्दल बोलू नये असा टोला लगावून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विखारी विचारधारेचा निकराने प्रतिकार करू असे आ. थोरात म्हणाले.   मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष थोरात यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना ते म्हणाले की गेली चार वर्ष जनतेच्या प्रश्नावर संघर्ष केला. जनसंघर्ष यात्रा काढली, विधानभवनावर मोर्चे काढले, जनआक्रोश माळावे घेतले.  सर्वांच्या सहकार्याने पक्ष वाढविण्यासाठी काम केले. पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला. त्यानंतरही आपण दोन महिने काम केले. आता पक्षनेतृत्ववाने बाळासाहे थोरांतांकडे नेतृत्व दिले आहे. त्यांना पूर्ण सहकार्य करू असे अशोक चव्हाण म्हणाले.

देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्ष नते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, गुजरातचे प्रभारी राजीव सातव,  हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनी पाटील , किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नसीम खान महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारूलता टोकस यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, बी एम संदीप, चेल्ला वामशी रेड्डी,संपतकुमार, आ. वर्षा गायकवाड, खा. बाळू धानोरकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे आदी नेते, एनएसयुआय चे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले.  तत्पूर्वी सकाळी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्षांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशिर्वाद घेतले. त्यानंतर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना व शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले व टिळक भवन येथे पदभार स्वीकारला.

 

टॅग्स :मुंबईकाँग्रेसआ. बाळासाहेब थोरात