कल्याणला डम्पिंगविरोधात काँग्रेसचा मोर्चा

By Admin | Updated: March 26, 2015 22:43 IST2015-03-26T22:43:28+5:302015-03-26T22:43:28+5:30

महापालिका मुख्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला बसतील, असा जाहीर इशारा भारतीय युवक काँग्रेसच्या सरचिटणीस कांचन कुलकर्णी यांनी दिला.

Congress Front against dumping Kalyan | कल्याणला डम्पिंगविरोधात काँग्रेसचा मोर्चा

कल्याणला डम्पिंगविरोधात काँग्रेसचा मोर्चा

कल्याण : संपूर्ण कल्याण शहराच्या आरोग्याला धोका निर्माण करणारा तसेच कल्याण डम्पिंग ग्राउंडवरील निर्माण होत असलेल्या धुराचा प्रश्न १० दिवसांत सोडवला नाही तर वाडेघर, आधारवाडी, सुभाषनगर, वायलेनगर परिसरातील महिला कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला बसतील, असा जाहीर इशारा भारतीय युवक काँग्रेसच्या सरचिटणीस कांचन कुलकर्णी यांनी दिला.
कल्याण खाडीकिनारी गणेशघाटाजवळ केडीएमसीचे मुख्य डम्पिंग ग्राउंड आहे. त्याची क्षमता संपल्याने गेली सात-आठ वर्षे हे मैदान हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत, मुंबईउच्च न्यायालयानेही दाखल झालेल्या सर्व याचिकांची गंभीर दखल घेऊन डम्पिंग ग्राउंड तातडीने हलविण्याचे आदेश दिले आहेत. पण, महापालिकेकडून त्याबद्दल अद्याप कोणतीही कृती झालेली नाही. गेल्या दीड महिन्यापासून या डम्पिंग ग्राउंडवर सतत आगी लागत आहेत. त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे फडके मैदान, सुभाषनगर, लालचौकी, आधारवाडी, वाडेघर येथे नव्याने झालेल्या नवीन वसाहतीतील नागरिकांना तेथे राहणे कठीण झाले आहे. कचऱ्यात नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या वायूमुळे या आगी लागतात. त्यासाठी कचऱ्यावर पाणी टाकण्यासाठी ठेकेदाराची पर्यायी व्यवस्था केली आहे. पण, त्यांची मुदत संपल्यावर नवीन ठेकेदाराच्या अद्याप नेमणुकाच झालेल्या नाहीत़ त्यामुळे लागलेल्या आगी विझवण्याचे काम कल्याण अग्निशामक दलाला करावे लागते. पण, त्यांनाही त्यात लक्ष देणे शक्य होत नाही व या डम्पिंग ग्राउंडवर प्रचंड प्रमाणात धूर निर्माण होतो. यामुळे या सर्व परिसरात डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे, खोकला, सर्दी, थंडीताप यांचे प्रमाण वाढले. त्याबरोबरच डास, कुत्रे यांचेही प्रमाण वाढले. यातून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. महासभेतही हा प्रश्न अनेकदा गाजला.
राज्य शासनाच्या नगरोत्थान अभियानांतर्गत घनकचऱ्याचे संकलन, वाहतूक, विल्हेवाट यासाठी ४४ कोटी रुपयांचे महापालिकेला अनुदान मिळाले. त्यात पहिल्या टप्प्यात ११ कोटी रुपये खर्च झाला. तरीही, हा प्रकल्प अद्याप पूर्ण झाला नाही. उंबर्डे येथे १० हेक्टर क्षेत्रात कचऱ्यापासून वीजनिर्मिती, कंपोस्ट खतनिर्मिती असे प्रकल्प राबवण्यासाठी ३३ कोटी रुपये वर्ग करण्यात आले. पण, या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध असल्याने तो वादग्रस्त ठरला. परिणामी, ३३ कोटी रुपये शासनाकडे परत गेले. या सर्व पार्श्वभूमीवर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न तसाच राहिला आहे. त्यामुळे नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. यामुळेच गुरुवारी युवक काँग्रेसतर्फे महिलांच्या मोर्चाचे आयोजन केले होते. इंदू आव्हाड, मंगला भोसले आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. (वार्ताहर)

४कल्याण शहराच्या आरोग्याला धोका निर्माण करणारा तसेच कल्याण डम्पिंग ग्राउंडवरील निर्माण होत असलेल्या धुराचा प्रश्न १० दिवसांत सोडवला नाही तर वाडेघर, आधारवाडी, सुभाषनगर, वायलेनगर परिसरातील महिला कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला बसतील, असा जाहीर इशारा भारतीय युवक काँग्रेसच्या सरचिटणीस कांचन कुलकर्णी यांनी दिला.

Web Title: Congress Front against dumping Kalyan