काँग्रेस-भाजपाची छुपी हातमिळवणी!
By Admin | Updated: August 25, 2014 00:01 IST2014-08-25T00:01:47+5:302014-08-25T00:01:47+5:30
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच विविध पक्षांची युती, आघाडी व अंतर्गत तडजोडीला सुरुवात झाली आहे.

काँग्रेस-भाजपाची छुपी हातमिळवणी!
राजू काळे, भार्इंदर
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच विविध पक्षांची युती, आघाडी व अंतर्गत तडजोडीला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भार्इंदर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांना शह देण्यासाठी काँग्रेसने भाजपासोबत गनिमी काव्याची युती केल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
सध्या पालिकेच्या सत्तेत शिवसेना-भाजपा युती बविआ व मनसेच्या पाठिंब्याने वरचढ ठरली असून, सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर मात्र अल्पमताचे सावट घोंगावत आहे. या मतांतराच्या समीकरणात भाजपाने काँग्रेससोबत छुपी हातमिळवणी करून भार्इंदर मतदारसंघात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी कंबर कसली आहे. याचा प्रत्यय गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आला असला तरी काही निमित्तांच्या भेटीगाठीत स्थानिक वरिष्ठ नेत्यांची साठ-गाठ होताना दिसून येत आहे. तत्पूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीवर आघाडीच्या धर्मावरून रणकंदन केले होते. राष्ट्रवादीकडून नेहमीच कुरघोडीचे राजकारण केले जात असल्याचे दुखणे दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसने चव्हाट्यावर आणून उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी आघाडी असतानाही स्थानिक काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचाराची धुरा न हाकता उलट शह देण्यासाठी आपल्याच गोटातील दोन प्रतिस्पर्धी उमेदवार उभे केले. मतदानावेळी येथील काँग्रेसचा पगडा मानल्या जाणाऱ्या नयानगर या मुस्लीमबहुल भागातून शिवसेनेला मात्र भरघोस मतदान झाले. अर्थात, निकालानंतर मोदी फॅक्टर चालल्याची चर्चा सुरू असली तरी स्थानिक राजकारणात मात्र काँग्रेसच्या असहकाराचीच चर्चा खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. यामुळे यंदाच्या आमदारकीच्या निवडणुकीतही काँग्रेसने राष्ट्रवादीला आघाडी असतानाही अंतर्गत शह देण्यासाठी कूटनीती अवलंबल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच, स्थायीत भाजपाने उपायुक्तांवरील कार्यमुक्तीचा ठराव मंजूर करण्यासाठी काँग्रेसच्या अतिक्रमण विभागप्रमुखाच्या निलंबनाच्या ठरावाला पाठिंबा देऊन एकमेकांचा अंतर्गत तह झाल्याची अनुभूती दिली. भाजपाने यंदाचे महापौरपद बहुजन विकास आघाडी (बविआ) ला देण्याचे मान्य करून त्या पक्षाचा पाठिंबा मिळवला असला तरी अद्याप विरारच्या मुख्यालयाची मोहोर उठलेली नाही. त्यामुळे यंदा काँग्रेसने भाजपाला भार्इंदरमध्ये सहकार्य करण्याचा छुपा डाव आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.