Join us  

आरे लाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आखला प्राणिसंग्रहालयाचा ‘डाव’, काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 2:30 AM

आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेडनंतर आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या नावाखाली संपूर्ण आरेचे जंगल लाटण्याचा डाव सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे.

मुंबई - आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेडनंतर आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या नावाखाली संपूर्ण आरेचे जंगल लाटण्याचा डाव सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. विविध प्रकल्पांच्या नावाखाली संपूर्ण आरे संपवायचा शिवसेना-भाजपचा डाव आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे.गोरेगाव आरे कॉलनीत मुंबई काँग्रेस आदिवासी विभागातर्फे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाविरोधात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. पिकनिक पॉइंटजवळील बिरसा मुंडा चौक येथे रविवारी ही सभा झाली. यावेळी विविध आदिवासी पाड्यांतील बांधव, सामाजिक संस्था, काँग्रेस पक्षातील पदाधिकाºयांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.संजय निरूपम म्हणाले की, आरे परिसरामध्ये २७ आदिवासी पाडे आहेत, ज्यामध्ये एक लाख १६ हजार लोक राहतात. आदिवासी बांधव येथे वर्षानुवर्षे शेती व भाजीपाल्याची लागवड करतात. त्यावर त्यांची उपजीविका चालते, परंतु प्राणिसंग्रहालयाच्या नावाखाली सर्व आदिवासी बांधवांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे सत्ताधाºयांचे षड्यंत्रआहे. आरेमधील १९० एकर जमीन प्रस्तावित आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयासाठी राखीवकरण्यात आली आहे. यातील १२० एकर जमीन प्राणिसंग्रहालयासाठी वापरली जाणार आहे. उरलेली ७० एकर जमीन विकासाच्या नावाखाली विकासकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.‘हा मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न’आरेला संपविण्याचा घाट घातला जात असून, आम्ही याचा तीव्र विरोध करत आहोत. हा फक्त आदिवासी रहिवाशांचा प्रश्न नसून, संपूर्ण मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुंबईसारख्या प्रदूषणाने ग्रासलेल्या आणि वर्दळीच्या शहरांना प्राणवायू देण्याचे काम आरेचा हरित पट्टा आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान करत आहे.जर हा हरित पट्टा नष्ट झाला, तर मुंबईचे आरोग्य धोक्यात येईल. आरे येथील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात हे आंदोलन यापुढेही असेच सुरू राहणार आहे, असे संजय निरूपम यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :आरेकाँग्रेस