Join us  

रेड झोनमधील कामगारांच्या वेतनाबाबत संभ्रमावस्था; केंद्राचे आदेश रद्द, तर राज्य सरकारचे कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 3:37 AM

१७ मे नंतरच्या वेतनाबाबत साशंकता

मुंबई : लॉकडाउनच्या काळात कामगार किंवा त्यांच्या वेतनात कपात करू नका याबाबत केंद्र सरकारने जारी केलेले आदेश आता रद्द झाले आहेत. त्यामुळे रेड झोनमधील बंद कंपन्यांमधील कामगारांना १७ मे नंतरचे वेतन देण्याचे बंधन नसल्याची भूमिका काही उद्योजकांनी घेतली आहे. मात्र, राज्य सरकारचे त्याबाबतचे आदेश कायम असल्याने ही भूमिका अयोग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.

देशात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर कामगारांच्या वेतनावर गदा येण्याची शक्यता गृहीत धरून ३० मार्च रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने कामगार आणि वेतन कपात न करण्याचे आदेश दिले होते. चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली. त्यावेळी यापूर्वीचे सर्व आदेश रद्द होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वेतनाबाबतचा आदेशही सध्या अस्तित्वात नसल्याचे काही उद्योजकांचे म्हणणे आहे. सरकारच्या आदेशानुसार काम बंद असतानाही ६० दिवसांचे वेतन आम्ही दिले. मात्र, रेड झोनमध्ये लॉकडाउन कायम असून तो यापुढे किती काळ सुरू असेल याबाबत कुणाकडेही ठोस उत्तर नाही. त्यामुळे यापुढील वेतनाचा भार पेलणे अशक्य असल्याचे या उद्योजकांचे मत आहे.

याबाबत कामगार विभागातील काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, केंद्र सरकारचे आदेश संपुष्टात आल्याचा दावा केला जात असला तरी राज्य सरकारनेसुद्धा साथ रोगप्रतिबंधक कायद्याच्या आधारे कामगार आणि वेतन कपात न करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे उद्योजकांची भूमिका कायदेशीर नसेल असे त्यांचे मत आहे. याबाबत वरिष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. संदीप पुरी यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या राज्य सरकारचा आदेश कायम असल्याने वेतन देणे क्रमप्राप्त असेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर

वेतनाबाबत केंद्र आणि राज्य सरकारने दिलेले आदेश कायदेशीर नसल्याच्या मुद्द्यावर उद्योजकांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारी त्यावर सुनावणी अपेक्षित होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारला आपले उत्तर न्यायालयापुढे मांडता न आल्याने ती सुनावणी एक आठवडा लांबणीवर पडली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या