निवडणूक कर्मचारी नियोजनात गोंधळ
By Admin | Updated: April 1, 2015 00:06 IST2015-04-01T00:06:18+5:302015-04-01T00:06:18+5:30
जिल्ह्यात दोन नगरपरिषदांच्या निवडणुकांबरोबरच सप्टेंबरमध्ये मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकादेखील हाती घेण्यात आल्या आहेत.

निवडणूक कर्मचारी नियोजनात गोंधळ
ठाणे: जिल्ह्यात दोन नगरपरिषदांच्या निवडणुकांबरोबरच सप्टेंबरमध्ये मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकादेखील हाती घेण्यात आल्या आहेत. यासाठी लागणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाचे नियोजन करताना मात्र महसूल विभागाचा गोंधळ उडाला आहे. या दोन्ही निवडणुकांच्या कामांची जबाबदारी एकाच अधिकारी, कर्मचाऱ्यावर दिल्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कुळगाव-बदलापूर व अंबरनाथ या दोन्ही नगरपरिषदांच्या निवडणुकांसह जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, पोटनिवडणुका हाती घेण्यात आल्या आहेत. या दोन्ही निवडणुकांचे मतदान २२ एप्रिल या एकाच दिवशी होणार आहे. यासाठीच्या विविध कामांसाठी महसूल विभागाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आदींचे अधिकारी, कर्मचारी घेतले आहेत. पण, त्यातील बहुतांशी कर्मचाऱ्यांना दोन्ही ठिकाणच्या निवडणूक कामांचे आदेश मिळाले आहेत.
त्यात बदल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असताना महसूलसह नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी कोणतीही सबब ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नाही. हे आदेश निवडणूक आयोगाचे असल्याने त्यात बदल करता येत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)