वेळेच्या अटींमुळे लाेकल प्रवाशांमध्ये गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:32 IST2021-02-05T04:32:04+5:302021-02-05T04:32:04+5:30
लोकल सुरू ; पण सर्वसामान्य प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोमवारी मुंबईची ...

वेळेच्या अटींमुळे लाेकल प्रवाशांमध्ये गोंधळ
लोकल सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोमवारी मुंबईची लाइफलाइन असणारी लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाली. अनलॉकच्या प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांना लोकल कधी सुरू होते, याची प्रतीक्षा होती. सोमवारी लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाली, पण वेळेच्या अटींमुळे अनेकांचा हिरमोड झाला. सकाळी ७ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ९ दरम्यान सर्वसामान्यांसाठी रेल्वे बंद असल्याने पहिल्याच दिवशी लोकल सेवेला नागरिकांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला.
मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकाबाहेर सकाळी सात वाजण्याच्या आधी लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी काही नागरिकांनी रेल्वे स्थानकावर हजेरी लावली. तिकीट खिडकीवरही प्रवाशांची लगबग पाहायला मिळाली. मात्र सात वाजल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे स्थानकाच्या बाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले. पहिल्या दिवशी उडणाऱ्या गोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकांच्या बाहेर पोलीस तैनात होते. सात वाजल्यानंतर पुन्हा पोलीस ओळखपत्र तपासून प्रवाशांना स्थानकात सोडत होते. तर सात वाजल्यानंतरदेखील काही प्रवासी रेल्वेने प्रवास करण्यासाठी पोलिसांसोबत वाद घालत होते. अनेकांनी रेल्वे तिकीट काढूनदेखील त्यांना स्थानकात न सोडल्याने ते प्रवासी तिकीट काउंटरवर जाऊन पैसे परत मागत होते. या वेळी सर्वसामान्यांसाठी रेल्वे पूर्ण क्षमतेने पूर्वीप्रमाणे सुरू करावी, अशी मागणी इतर प्रवासी करीत होते. तर दुपारी १२ वाजल्यानंतरदेखील रेल्वे प्रवासाला नागरिकांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला.
प्रतिक्रिया
शासनाने घेतलेला वेळेची अट घालण्याचा निर्णय योग्य आहे. आता मुंबईतील सर्व कार्यालयांच्या वेळासुद्धा या वेळेप्रमाणे बदलाव्यात. सर्व काही टप्प्याटप्प्याने सुरू केले तरच आपण कोरोनावर पूर्णपणे मात करू शकतो. तसेच सामान्य नागरिकांनीदेखील याला सहकार्य करायला हवे.
- मनोज इनामदार (सामान्य प्रवासी)
दररोज कामाला जाताना बसने होणारा प्रवास अत्यंत त्रासदायक, खर्चीक व वेळकाढू आहे. ट्रेनचा प्रवास अत्यंत सोयीस्कर आहे. मात्र आता सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची ठेवलेली वेळ अत्यंत चुकीची आहे. महिलांची यातून सुटका झाली असली तरी पुरुषांसाठीदेखील शासनाने विचार करायला हवा.
- मानसी केणी (सामान्य प्रवासी)